Air India Express Planes Wheels Detach Passengers Safely Evacuated
‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची चाके निखळली
महाराष्ट्र टाइम्स•
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे फुकेत विमानतळावर खडतर लँडिंग झाले. या दुर्घटनेत विमानाची पुढील दोन चाके निखळून पडली. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. विमान धावपट्टीवर अडकल्याने विमानतळ संचलन तात्पुरते थांबवण्यात आले. या घटनेची चौकशी केली जाईल.
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या बोइंग ७३७ मॅक्स विमानाचे फुकेत विमानतळावर बुधवारी खडतर लँडिंग झाले. या घटनेत विमानाची पुढील दोन चाके निखळून पडली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हैदराबादहून फुकेतकडे जाणाऱ्या व्हीटी-बीडब्ल्यूक्यूच्या आयएक्स९३८ या विमानासोबत हा प्रकार घडला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या ( DGCA ) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
या अपघातामुळे धावपट्टीवर विमान अडकले आणि विमानतळावरील कामकाज काही काळासाठी थांबवावे लागले. अपघातग्रस्त विमानाला नंतर सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "फुकेत विमानतळावर विमानाच्या पुढील चाकांमध्ये बिघाड झाला. विमान कर्मचाऱ्यांनी सर्व नियमांचे पालन केले. प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले."DGCA च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुकेत विमानतळावरील धावपट्टी ९ वर विमानाचे ' हार्ड लँडिंग ' होताना ते काही प्रमाणात उसळले. या घटनेची चौकशी थायलंडच्या विमान वाहतूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून योग्य अधिकाऱ्यांकडून केली जाईल. प्रवाशांना विमानाबाहेर काढून टर्मिनल भवनात नेण्यात आले. विमानातील नेमकी प्रवासी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.