कलबुर्गी : ‘कर्नाटकात सध्या तरी मुख्यमंत्री बदल होणार नाही,’ असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. चार राज्यांसह कर्नाटकातील दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचे निकाल चार मे रोजी जाहीर झाल्यावर नेतृत्व बदल आणि मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. मागील दोन वर्षांपासून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के. शिवकुमार यांच्या वादामुळे नेतृत्वबदलाची शक्यता वर्तवली जात होती. सध्या राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा असून, या पार्श्वभूमीवर खर्गे यांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.
वाघाचा मृत्यू
भोपाळ : मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र अभयारण्यात (केटीआर) एका वाघिणीचा बछड्यासह मृत्यू झाला. यंदाच्या वर्षात आतापर्यंत २७ वाघांचा मृत्यू झाला आहे. ८ ते १० वर्षांची वाघीण आणि दीड वर्षांचा तिचा बछडा या दोघांनाही अभयारण्यातील एका खोलीत उपचारासाठी ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. संदीप अगरवाल यांनी सांगितले.
संचालकांना जामीन
नवी दिल्ली : मनी लाँडरिंग प्रकरणात अटकेत असलेले ‘आय-पॅक’ या संस्थेचे सहसंस्थापक आणि संचालक विनेश चंडेल यांना गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला. पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळा प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चंडेल यांच्या जामीनअर्जाला कोणताही विरोध न केल्याने दिल्ली न्यायालयाचे न्यायाधीश अमित बन्सल यांनी चंडेल यांना जामीन मंजूर केला. १४ एप्रिल रोजी दिल्ली न्यायालयाने चंडेल यांना दहा दिवसांची कोठडी सुनावून ईडीला त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
तो लाम यांचा दौरा
नवी दिल्ली : व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम पुढील आठवड्यात तीन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. आखातामधील युद्धामुळे बदललेली भू-राजकीय परिस्थिती आणि व्यापाराला येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात असून, यामध्ये संरक्षण, व्यापार आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान या क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने चर्चा होईल. अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतरचा लाम यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल.
सिवानमध्ये हत्या
सिवान : वाहनाला कार धडकल्याच्या वादातून बिहारमधील सिवान येथे भाजपच्या नातेवाइकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. भाजपचे माजी आमदार मनोज सिंग यांचा भाचा हरिसिंग आणि त्याचे वडील चंदनसिंग दोघेही एका गावातून गाडीने जात असताना त्यांची गाडी एका वाहनाला धडकली. त्यातून निर्माण झालेल्या वादातून हरिसिंग याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
इमर्जन्सी लँडिंग
रायपूर : महिला प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे कोलकाता-पुणे या इंडिगोच्या विमानाने छत्तीसगडच्या रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केल्याची घटना गुरुवारी घडली. कोलकाता येथून पुण्याकडे जात असलेले इंडिगोचे ६ई-१३५ हे विमान हवेत असताना महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याने वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडे तातडीने उतरण्याची परवानगी मागितली. त्यानुसार दुपारी १२च्या सुमारास विमान रायपूर विमानतळाकडे वळविण्यात आले. विमानतळानजीकच्या रुग्णालयात महिला प्रवाशाला उपचारासाठी दाखल करण्यात आले.






