शरीर धष्टपुष्ट आणि बुद्धी तल्लख ठेवायची असेल तर ड्रायफ्रूट खा, असा सल्ला दिला जातो. म्हणूनच या सुका मेव्याला मोठी मागणी असते. मात्र हा सुका मेवा महाग असल्याने तो स्वस्त कुठे मिळेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. असाच स्वस्त सुका मेवा खरेदी करण्याच्या प्रयत्नात सायबर चोरांनी अनेकांचे आर्थिक स्वास्थ्य बिघडवले आहे.
मूळचा पश्चिम बंगाल येथील दीपसंख कामानिमित्त भायखळा येथे आला होता. या ठिकाणी फेसबुक पाहात असताना त्याला एक जाहिरात दिसली. या जाहिरातीमध्ये ‘चार किलो ड्रायफ्रूट केवळ ३९९ रुपयांत’ असे नमूद करण्यात आले होते. इतक्या स्वस्तात मिळत असल्याने दीपसंख याने जाहिरातीमधील लिंकवर क्लिक केले. ३९९ रुपये भरण्यासाठी त्याला डेबिट कार्डचा तपशील भरण्यास सांगण्यात आले. हा तपशील भरल्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी त्याने टाकला असता, थोडी थोडी करून दोन लाख ७५ हजारांची रक्कम त्याच्या खात्यामधून परस्पर वळती करण्यात आली. रक्कम वजा होत असल्याचे संदेश आल्यावर फसवणूक झाल्याचे दीपसंख याच्या लक्षात आले आणि त्याने ताबडतोब भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार केली.
असाच प्रकार एका ७५ वर्षीय वृद्धाच्या बाबतीतही घडला. ‘तीन हजार रुपयांत पाच किलो ड्रायफ्रूट’ अशी जाहिरात त्यांनी सोशल मीडियावर पाहिली. या जाहिरातीवर क्लिक करताच एक ‘एपीके’ फाइल मोबाइलवर डाउनलोड झाली. या फाइलवर क्लिक करून त्यांनी क्रेडिट कार्डचा तपशील आणि ‘सीव्हीव्ही’ नंबर टाकून तीन हजार रुपये भरले. मात्र पेमेंट न झाल्याने त्यांनी मोबाइल ठेवून दिला. काही वेळ झोप घेतल्यानंतर ते उठले आणि त्यांनी मोबाइल हातामध्ये घेतला. त्यावेळी क्रेडिट कार्डवर दीड लाखांपेक्षा अधिक रक्कम काढण्यात आली होती. वृद्धाने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






