आजपासून ‘कलाकुंभ’

महाराष्ट्र टाइम्स

कल्याणमध्ये १ ते ३ मे दरम्यान कलाकुंभ सांस्कृतिक महोत्सव साजरा होत आहे. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके मैदानावर विविध कार्यक्रम सादर होतील. यात संगीत, चित्रकला, नृत्य, सौंदर्य स्पर्धा आणि खाऊ गल्लीचा समावेश आहे. कल्याण गायन समाजाचा सत्कारही केला जाईल. सर्व कार्यक्रमांना विनामूल्य प्रवेश आहे.

kalakumbh festival a celebration of cultural joy

रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या वतीने आज, १ मे ते ३ मे दरम्यान क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके मैदान, लाल चौकी, कल्याण (प) येथे संध्याकाळी ५ वाजता कलाकुंभ सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

शुक्रवार, १ मे रोजी 'कल्याण गायन समाज' आयोजित 'अभिजात' राग ते रिदम एक सुरेल संगीत प्रवास सोबतच 'रंगाविष्कार' ही चित्रकला स्पर्धा पार पडणार आहे. तसेच शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या कल्याण गायन समाज संस्थेचा रोटरी क्लबच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. शनिवार, २ मे रोजी 'देह देवाचे मंदिर' हा प्राचीन मंदिर स्थापत्यकला आणि शास्त्रीय नृत्य यांचा मिलाफ असलेला विशेष कार्यक्रम, तसेच 'देसी ड्रेप्स' (साड्यांच्या कथा) हा आगळावेगळा उपक्रम सादर होईल. रविवार, ३ मे रोजी 'मिसेस ओजस्विनी' ही सौंदर्य स्पर्धा आणि शेवटच्या सत्रात पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल. महोत्सवात महारांगोळी, 'संस्कृती हाट', शिल्पमहर्षी सदाशिव साठे 'कलादालन' आणि खवय्यांसाठी 'खाऊ गल्ली' अशा विविध उपक्रमांची रेलचेल असेल. रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.