सचिन तेंडुलकर यांच्या कृतीमध्ये ताकद एवढी होती की आपल्या अडचणींच्या काळात कधीही न घाबरता प्रतिकूल परिस्थितीशी ते लढले म्हणून आयुष्यात कधीही असुरक्षित झाले नाहीत, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केले.
विद्याधर ठाणेकर लिखित ' विक्रमादित्य सचिन ' आणि वृंदा दाभोळकर लिखित 'शब्दांच्या पलीकडले पाडगावकर' या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शिवनेरी मैदान, ठाणे येथे झाले. या कार्यक्रमास ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, नरेश म्हस्के, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर, संजय बनसोड, ठाणे जिल्ह्याचे ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील उपस्थित होते. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कृष्णा प्रकाशन, स्वराज्य सेवा मंडळ व नुपूर आर्ट अकॅडमी यांच्या वतीने झाला.
विद्याधर ठाणेकर यांनी लिहिलेल्या 'विक्रमादित्य सचिन तेंडुलकर' या पुस्तकात तेंडुलकर यांच्या खेळाचे विश्लेषण आहे. सचिन तेंडुलकर यांच्या गुणवर्णनाचा ठेवा आहे. ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली की भारतीय संघ अधिक मजबुतीने उभा केला पाहिजे, तेव्हा प्रशासकाने सचिन तेंडुलकर यांना कर्णधारपद स्वीकारण्यास सांगितले, असेही शेलार यांनी सांगितले.
वेंगुर्ला येथे होणाऱ्या मंगेश पाडगावकर यांचे स्मारक राज्य सरकारने चांगले करावे, ही अपेक्षा डॉ. महेश केळुस्कर यांनी व्यक्त केली. दोन कपाटे टाकून एवढ्या मोठ्या कवीचे स्मारक करू नये, अशीही सूचना त्यांनी केली.






