राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच नाशिक विभागातील धरणांमधील पाणीपातळी झपाट्याने खाली जात आहे. जलसंपदा विभागाच्या २९ एप्रिलच्या अहवालानुसार, नाशिक विभागात ५३९ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये आता केवळ ४२.६९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत (३९.०५५) साठा थोडा जास्त असला तरी, वाढत्या उष्णतेमुळे अनेक प्रकल्प तळ गाठत असल्याने आगामी मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्र झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक विभागातील २२ मोठ्या प्रकल्पांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ३,७३१ दशलक्ष घनमीटर आहे. सद्यस्थितीत त्यात फक्त ४५.२१ टक्के साठा उरला आहे. जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या गंगापूर धरण समूहात ५२.२७ टक्के पाणी शिल्लक आहे. भावली धरणातील उपयुक्त साठा शून्य टक्क्यांवर आला असून धरण कोरडे पडले आहे.
एप्रिल अखेरीस ४२ टक्क्यांवर आलेल्या या साठ्यामुळे मे महिन्यातील बाष्पीभवन आणि वाढती मागणी लक्षात घेता प्रशासनाला पाणीकपातीचे किंवा आवर्तनाचे कडक नियोजन करावे लागणार आहे.






