माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत

महाराष्ट्र टाइम्स

बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना भूसंपादन मोबदला गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. बीड पोलिसांनी लातूरमधून ही कारवाई केली. या अटकेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना गुरुवारी बीड पोलिसांनी भूसंपादन मोबदला गैरव्यवहार प्रकरणी लातूरमधून अटक केली. सहायक पोलिस अधीक्षक वेंकटरामन यांच्या पथकाने कारवाई केली. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या नेतृत्वात या गैरव्यवहाराचा तपास सुरू होता. पाठक यांना लातूर येथून अटक केली असून, शुक्रवारी बीडच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. पाठक यांच्या अटकेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

पाठक हे बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना हा गैरव्यवहार झाला. बीड येथून त्यांची बदली मत्स्यआयुक्त मुंबई येथे बदली झाली होती. मात्र, त्यांची तेथूनही उचलबांगडी करण्यात आली व त्यांना कोणत्याच पदावर नियुक्ती न देता प्रतीक्षेत ठेवले होते. गुरुवारी सकाळी बीड पोलिसांचे एक पथक लातूरमध्ये पोचले. त्यानंतर पाठक यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या पूर्वीही दोन वेळा त्यांना चौकशीसाठी बीडच्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नोटीस देऊन हजर करण्यात आले. मात्र, या वेळी लातूरच्या पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना अटक करण्यात आली आहे. भूसंपादन कार्यालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर केलेल्या चौकशीतून धक्कादायक तथ्ये समोर आली होती.