स्कूटरची ‘बॅक किक’ बसली तेव्हा...

Contributed byवीरेंद्र सोनवणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

माणसाच्या जिवंतपणाची ओळख म्हणजे गोष्टी. पूर्वी शेकोटीभोवती सुरू झालेला गोष्टींचा प्रवास आज पॉडकास्टपर्यंत पोहोचला आहे. मानवी जवळीक आणि उत्सुकता हा त्याचा गाभा आहे. चार मित्र जमले की एक जण 'एकदा काय झालं...' म्हणतो आणि सगळे कान देऊन ऐकतात. या गप्पा माणसाला यंत्र होण्यापासून वाचवतात. अशाच एका आठवणीत वडिलांच्या धैर्याची कहाणी आहे. स्कूटरची किक पायाला लागूनही त्यांनी मुलाला घरी आणले.

स्कूटरची ‘बॅक किक’ बसली तेव्हा...

कदा काय झालं...’ हे तीन शब्द कानावर पडले, की माणसाच्या मनाचं कुलूप अचानक उघडतं! आज आपण कितीही धावपळीच्या, हायटेक जगात जगत असलो, १५ सेकंदांचे रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ स्क्रोल करीत असलो, तरी एका जिवंत माणसानं दुसऱ्या माणसाला समोर बसवून सांगितलेली खरीखुरी गोष्ट ऐकण्यात जी मजा आहे, ती कशातच नाही. खरं तर, गोष्टी ऐकणं आणि सांगणं ही माणसाची अगदी आदिम काळापासूनची मानसिक गरज आहे. पूर्वीच्या काळी शेकोटीभोवती जमा होऊन मौखिक पद्धतीने सुरू झालेला हा प्रवास आज पॉडकास्ट आणि सोशल मीडियापर्यंत पोहोचला आहे; पण त्याचा गाभा तोच आहे, मानवी जवळीक आणि उत्सुकता.

चार मित्र चहाच्या टपरीवर किंवा कट्ट्यावर जमतात आणि त्यातला एक जण ‘एकदा काय झालं माहिती आहे का...’ असं म्हणतो, तेव्हा बाकीचे आपले फोन बाजूला ठेवून, कान देऊन ऐकायला लागतात. या गप्पा माणसाला यंत्र होण्यापासून वाचवतात. आपल्या घरातली वृद्ध माणसं म्हणजे अनुभवांचं जणू समृद्ध ग्रंथालय असतात. आजकाल त्यांचे किस्से निवांत ऐकून घेणारे कान थोडे कमी होत चालले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

काही कथा खूप मोठ्या नसतात; पण त्या मनात अशी काही जागा करून बसतात, की माणूस आयुष्यभर विसरू शकत नाही. अशीच एक आठवण माझ्या मनात आजही अगदी ताजी आहे. मी साधारण पाच-सहा वर्षांचा होतो. त्या काळी आजच्यासारखे हातात मोबाइल फोन नव्हते. एका संध्याकाळी मी आणि पप्पा आमच्या जुन्या स्कूटरवरून बाजारात गेलो होतो. कामं आटोपून निघताना स्कूटर बंद पडली. पप्पांनी ती चालू करण्यासाठी जोरात किक मारली; पण घात झाला! ती लोखंडी किक सटकली आणि थेट त्यांच्या पायाला लागली. काही क्षणात तिथं रक्ताचं थारोळं झालं. तो प्रसंग पाहून पाच वर्षांचा मी पार थक्क झालो होतो, मला काहीच समजत नव्हतं.

आजूबाजूच्या लोकांनी पप्पांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. घरी निरोप द्यायला फोन नव्हता. बराच वेळ झाला, तरी आम्ही घरी न पोहोचल्यानं घरातले काळजी करीत होते. तिथं डॉक्टर पप्पांना विश्रांती घ्यायला सांगत होते; पण पप्पांना घरच्यांची काळजी होती. त्यांनी डॉक्टरांचं न ऐकता, कशाचीही पर्वा न करता त्याच दुखावलेल्या पायानं पुन्हा स्कूटरला किक मारली आणि कसेबसे मला घेऊन घरी पोहोचले. घरी सगळा प्रकार समजला, तेव्हा मी इतक्या मोठ्या प्रसंगात घाबरलो नाही म्हणून घरचे माझं कौतुक करीत होते. दुसरीकडे, वडिलांना खूप लागल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आली होती. त्या वेळी पप्पांच्या पायाला दहा टाके पडले होते.

आज इतकी वर्षं झाली, ही साधी; पण पप्पांच्या धैर्याची कहाणी आठवली, की मला आजही भारावून येतं. अशा कित्येक लहान-मोठ्या कथा आपल्या सगळ्यांच्याच जगण्याचा कणा असतात. कधी आईच्या संघर्षाची गोष्ट, तर कधी मित्राची फजिती. या कथा आपल्याला एकमेकांशी घट्ट बांधून ठेवतात. मग विचार काय करताय? आजची संध्याकाळ मोबाइलच्या स्क्रीनवर वाया घालवण्यापेक्षा, जरा निवांत वेळ काढा, कोणा तरी जवळच्या माणसाशेजारी बसा, चहाचा कप हातात घ्या आणि हसून विचारा, ‘हो, एकदा काय झालं?’