यवत परिसरात नुकतेच उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणानंतर पुणे महापालिका आरोग्य विभागाने या प्रकरणाचे धागेदोरे पुणे शहराशी जोडलेले आहेत का, तसेच शहरातही अशा प्रकारचे बेकायदा प्रकार सुरू आहेत का, याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
यवत येथील प्रकरणात पुणे शहरातील कोणतीही व्यक्ती, डॉक्टर किंवा वैद्यकीय केंद्राचा संबंध आहे का, याबाबतची माहिती मिळावी यासाठी महापालिका आरोग्य विभागाने यवत पोलिसांना पत्र पाठवले आहे. पोलिस तपासातून मिळणाऱ्या माहितीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या. शहरातील सोनोग्राफी केंद्रांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, नोंदींची तपासणी करणे आणि संशयास्पद बाबी आढळल्यास तातडीने कारवाई करणे, असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
शहरातील नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटरची वर्षातून दोन वेळा तपासणी केली जाते. यंदाच्या तपासणीचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. जुलैपासून नवीन प्रभागरचनेनुसार तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले, की नुकतीच राज्याच्या समितीची बैठक झाली. बेकायदा सोनोग्राफी सेंटर आणि गर्भलिंग निदान प्रकरणांची माहिती मिळण्यासाठी नागरिकांना कसे सहभागी करून घेता येईल, याबाबत बैठकीत चर्चा झाली.
राज्य आरोग्य विभाग आणि महापालिका आरोग्य विभाग नोंदणीकृत डॉक्टर व सोनोग्राफी सेंटरची तपासणी करतात. मात्र, नोंदणीकृत डॉक्टर आणि रुग्णालयांमध्ये या प्रकारे गर्भलिंग निदान तपासणी होत नसल्याचे आतापर्यंतच्या तपासणीतून समोर आले आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये बोगस डॉक्टर या तपासण्या करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय व्यावसायिक नसलेल्या या बनावट डॉक्टरांना कसा आळा घालयचा आणि त्यांची माहिती कशी मिळवायची असा प्रश्न आरोग्य विभागापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे कारवाईबाबत नवीन आराखडा तयार करावा लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.











