बैल बिथरला; अंगावर चालून आला

Contributed byशिवाजी चव्हाण|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सातारा येथील सायन्स कॉलेजच्या १९६९-७० च्या बॅचमधील विद्यार्थ्यांची कास पठारची अभ्यास सहल आठवणीत राहिली. प्राध्यापक चव्हाण सर यांच्यासोबत गेलेल्या या सहलीत फुलांचा अभ्यास झाला. अचानक एका बैलाने हल्ला केला, पण एका विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखून स्वतःचा बचाव केला. या मजेशीर आठवणी आजही ताज्या आहेत.

बैल बिथरला; अंगावर चालून आला

सायन्स कॉलेज, सातारा इथं १९६९-७०मध्ये बी.एस्सी. करीत होतो. माझा ‘बॉटनी’ हा विषय होता. आमचे प्राध्यापक चव्हाण सर नेहमी स्टडी टूरला नेत असत. सप्टेंबर महिन्यात फुलांच्या अभ्यासासाठी कास पठारला अभ्यास सहल ठरविण्यात आली. आम्ही १०-१२ विद्यार्थी - विद्यार्थीनी आणि प्राध्यापक असे १३-१४ जण साताऱ्याहून एस.टी. बसनं कास पठारला पोहोचलो. पठारावर विविध रंगांची फुलं फुलली होती. सरांनी फुलांची वैशिष्ट्यं सांगितली.

पठार पाहून झाल्यानंतर थोड्या विश्रांतीसाठी आम्ही जवळच असलेल्या रेस्ट हाउसच्या व्हरांड्यात थांबलो. सरांनी आपली शबनम उघडून पाण्याची मोठी बाटली आणि लिमलेटसारख्या दिसणाऱ्या चार गोळ्या काढल्या. मला जवळ बोलावून त्यातील दोन गोळ्या हातावर ठेवल्या. मी त्या तोंडात टाकल्या. सर ओरडले, ‘अरे अरे, त्या सरबताच्या आहेत.’ गांगरून मी त्या पटकन थुंकून टाकल्या. सगळ्यांची हसून पुरेवाट झाली. सरबताच्या गोळ्यांची मला काहीच कल्पना नव्हती आणि सरांना बहुतेक माझी फजिती करायची होती. सर विद्यार्थ्यांत मिळून मिसळून वागणारे आणि मोकळ्या स्वभावाचे होते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या आवडीचे होते. सरांनी इतर गोळ्यांचं सरबत केलं आणि सर्वांना दिलं. त्यानंतर आमची सहल कास तलावावर गेली. निळ्याशार पाण्यात बोटिंग करीत आम्ही तलावाच्या पैलतीराला पोहोचलो. त्या बाजूच्या वनस्पतींचा अभ्यास केला. रंगीबेरंगी ऑर्किड पाहून तलावाच्या बंधाऱ्यावर आलो. बंधाऱ्याच्या उतारावर दुर्मीळ असा ‘आस्मुंडा’ नावाचा नेचा (फर्न) फुलला होता. सर म्हणाले, ‘अरे तो पाहा, आस्मुंडा फुलला आहे. कोणी तरी त्याच्या फांद्या आणा आणि प्रिझर्व करून हर्बेरियमला लावा.’ मी लगेच शबनम सावरत आस्मुंडाकडे धावत निघालो. मला पळताना पाहून थोड्या अंतरावर चरत असलेला बैल बिथरला आणि चालून आला. सगळ्यांचा जीव टांगणीला लागला. मीही चांगलाच घाबरलो. बाजूला पळून जायला जागा नव्हती. त्यात बांधाचा उतार आणि पुढं पाण्याचा डोह. मी प्रसंगावधान राखून पटकन एका दाट झुडपात उडी मारून लपलो. बैलाला मी दिसलो नाही. तो थोडा थबकला आणि पुढं गेला. सगळ्यांनी शिट्या, टाळ्या वाजवल्या. त्या आवाजानं बैल बावरून आणखी दूर गेला. बैल दूर गेलेला पाहून मी हळूच झुडपाबाहेर पडलो आणि आस्मुंडा घेऊन सुखरूप वर आलो. मी सुखरूप आलेला सरांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला.

पुढं कॉलेजच्या रस्त्यावरून आम्ही वर्गमित्र पुढे जात असताना पाठीमागून येणाऱ्या आमच्या मैत्रिणी हळूच, ‘बैल आला, बैल आला...’ असं गमतीनं ओरडत. आम्ही सारे एकमेकांना हसून दाद देत असू. असे ते कॉलेजचे मजेशीर दिवस होते.