पुणे : मद्याच्या अंमलाखाली सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून खडक पोलिस ठाण्यात अंमलदाराला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. रोहन गौतम साळवे (वय २६, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिस अंमलदार चंद्रशेखर शरणप्पा हुणचळगी (वय २६, रा. शिवाजीनगर) यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास टिळक रस्ता आणि खडक पोलिस ठाण्यात घडली. आरोपी मद्यपान करून टिळक रस्त्यावर मध्यरात्री हॉटेल सुरू असल्याचा दावा करून गोंधळ घालत होता. त्यामुळे गस्तीवर असलेल्या तक्रारदारांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले असता त्याने पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली. त्या वेळी त्याने तक्रारदारांसह पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली.







