अविस्मरणीय दिवस आणि क्षण!

Contributed byबाळकृष्ण बाचल|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मार्च १९९० मध्ये पुणे महापालिकेच्या शाळेतील शिक्षकाला शैक्षणिक बाहुली नाट्यासाठी दिल्लीत पुरस्कार मिळाला. उपराष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. शिक्षकाने बाहुली नाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण दिले. या पुरस्काराने नवी खडकीचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचले. हा अविस्मरणीय क्षण शिक्षकाच्या स्मरणात कायम राहिला.

contribution in education ccrti award and unforgettable moments

मार्च १९९० हा दिवस आणि या दिवसातील तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. पुणे महापालिकेच्या नवी खडकीमधल्या शाळा क्रमांक ७२मध्ये मी कार्यरत होतो. सातारा इथं डी. एड.ला असतानाच कार्यानुभव या विषयांतर्गत बाहुली नाट्य (पपेट शो) शिकण्याचा योग आला. शैक्षणिक बाहुली नाट्याचं प्रशिक्षण सीसीआरटी संस्था, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेतलं होतं.

शालेय अध्यापनात बाहुली नाट्याचा उपयोग करून गाणी, गोष्टी, शालेय पाठ शिकवत गेलो. आनंददायी शिक्षण देऊ लागलो. सामाजिक जाणीव, संस्कार, वृक्षांचं महत्त्व, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी विषयांवरील बाहुली नाट्याचे कार्यक्रम शिक्षक प्रशिक्षण शिबिरं, सामाजिक संस्था, मंडळं या ठिकाणी सादर करू लागलो. कार्यक्रमांचे अभिप्राय, फोटो सातत्याने सीसीआरटीकडे (सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण संस्था, नवी दिल्ली) पाठवत होतो. एक दिवस शाळेच्या पत्त्यावर पत्र आलं. त्यामध्ये ‘आपणास सीसीआरटीचा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून, नवी दिल्लीत होणाऱ्या एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे,’ असा मजकूर होता. शैक्षणिक बाहुली नाट्याच्या उत्कृष्ट कार्याबद्दलचा हा पुरस्कार होता. ‘नवी खडकीचं नाव नवी दिल्लीपर्यंत गेलं’ अशी गावकऱ्यांची, पालकांची प्रतिक्रिया होती.

३१ मार्चचा दिवस उजाडला. एक एक पुरस्कार्थी शिक्षकाचं नाव पुकारण्यात येत होते. माझं नाव आणि माहिती ऐकताच माझा ऊर भरून आला. व्यासपीठावर आलो. डॉ. शंकर दयाळ शर्मा यांना कृतज्ञतनं नमस्कार केला. त्यांनी हिंदीतून विचारलं, ‘कुठून आलात?’ ‘महाराष्ट्रातून,’ मी नम्रपणे म्हणालो. ते पुढं म्हणाले, ‘महाराष्ट्रातून नक्की कुठून?’ ‘पुण्यातून,’ असं म्हणताच त्यांनी हातात हात घेत अभिनंदन केलं. एवढ्या मोठ्या व्यक्तीनं हातात हात घेतल्यानं माझं अंग रोमांचित झालं. फोटोग्राफरनं हा अनमोल क्षण टिपला. शाल, गौरव पदक, प्रशस्तिपत्र स्वीकारून मी खाली उतरलो. या अविस्मरणीय क्षणाची आठवण गेली ३६ वर्षं दर वर्षी ३१ मार्चला होते आणि हे स्मृतिचित्र पाहताना सारा प्रसंग आठवतो.