पुन्हा एकदा बालपण जगलो

Contributed byगौरी कुलकर्णी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सांगलीतील जुने मित्र-मैत्रिणी अनेक वर्षांनी एकत्र आले. सिंहगडाजवळील रिसॉर्टमध्ये झालेल्या भेटीत बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. शाळेतील निरागस दिवस, मैदानावरच्या गमतीजमती आठवून सगळेच रमून गेले. एकमेकांच्या आयुष्यातील प्रवासाची माहिती घेतली. या भेटीने जुने नातेसंबंध अधिक घट्ट झाले. भविष्यात संपर्कात राहण्याचा निर्धार केला.

पुन्हा एकदा बालपण जगलो

झं माहेर सांगलीचं. माझा जन्म, बालपण, शाळा, मित्र-मैत्रिणी आणि असंख्य आठवणी सगळं काही सांगलीतच रुजलेलं आहे. त्या काळी शाळा क्रीडा प्रबोधिनीशी संलग्न असल्यामुळे, शिक्षणाबरोबरच खेळांनाही महत्त्व होतं; त्यामुळे आमचं बालपण मैदानावर, मित्र-मैत्रिणींमध्ये आणि खोड्यांमध्ये गेलं.

नीता, गंगातीरकर, प्रणिता बोथरा, वीणा, ज्योती, रंजना कोकरे आणि इतर अनेक मैत्रिणी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होत्या. मुलामुलींची शाळा असल्यानं संग्राम सडोलकर, नवनाथ हजारे, शिवाजी, नीलेश पाटील, महेश भटेवरा, किरण शेजाळे, अविनाश, समीर शेलार, समीर कोकरे यांसारखे मित्रही लाभले. शाळेतील दिवस म्हणजे वेगळंच विश्व होतं. एकत्र डबे खाणं, एकमेकींच्या डब्यातील भाजीची देवाणघेवाण, शाळा सुटल्यानंतर मैदानावर खेळणं, धावपळ, मस्ती, खोड्या... सगळंच किती निरागस आणि आनंदी होतं! नववीनंतर प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या झाल्या. मी जवळपास तेरा-चौदा वर्षं अमेरिकेत होते. काही मित्र-मैत्रिणींशी संपर्क टिकून होता. सोशल मीडियामुळे हरवलेले धागे पुन्हा जुळू लागले. कोव्हिड काळात फोनवरून संवाद वाढला आणि हळूहळू आमचा सुंदर ग्रुप तयार झाला. मग सुरू झाली गेट-टुगेदरची चर्चा.

शेवटी तो दिवस उजाडला. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका रिसॉर्टमध्ये आम्ही जवळपास अकरा जण पुन्हा एकत्र आलो. रिसॉर्टमध्ये पोहोचताच गप्पांचा आणि आठवणींचा फड रंगला. शाळेत असताना मुला-मुलींमध्ये बोलणं कमी असायचं. आज भेटल्यावर इतकी सहजता आणि जवळीक वाटली, की जणू काळच थांबला होता. कोण काय करतं, कुठं राहतं, मुलं किती आहेत, आयुष्यात काय मिळवलं असे किती तरी विषय निघाले. दहावीतले ते निरागस मित्र आज आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे उभे आहेत, हे पाहून खूप समाधान वाटलं. भविष्यात एकमेकांना कशी मदत करता येईल, संपर्कात कसं राहता येईल यावरही चर्चा झाली. नीतानं खास जमवून आणलेल्या आमरसाच्या जेवणानं दिवसाची रंगत आणखी वाढवली. जेवताना, फिरताना, फोटो काढताना आणि गप्पा मारताना वेळ कसा गेला ते कळलंच नाही. संध्याकाळी निरोपाची वेळ आली, तेव्हा मन पुन्हा बालपणात जाऊन पोहोचलं. एका दिवसासाठी का होईना, आम्ही पुन्हा एकदा तेच शाळकरी मित्र-मैत्रिणी झालो होतो. नकळत वाटून गेलं, की आपल्या मुलांनाही अशीच निरागस मैत्री , असेच सुंदर क्षण अनुभवायला मिळावेत.