ध्याकाळी साडेपाच - सहाच्या सुमारास नंदुरबारच्या आमच्या तांबोळी गल्लीत एकापाठोपाठ एक अशा म्हशी यायच्या. विशेष म्हणजे प्रत्येक म्हैस बरोबर आपल्या खुंटासमोर येऊन उभी राहायची. आश्चर्य म्हणजे, त्यांच्या उभं राहण्यात कधीही घोटाळा व्हायचा नाही. त्यांच्याबरोबर आलेला माणूस किंवा छोटा मुलगा प्रत्येक म्हशीला दोरानं बांधून निघून जायचा. हारीनं बांधलेल्या त्या म्हशी पाहतानाचं दृश्य डोळ्यांना सुखावणारं असायचं.
सकाळी सकाळी सगळ्या म्हशी चरायला शेतात, मळ्यात नेल्या जायच्या. दिवसभर त्या सगळ्या म्हशी तिकडंच असायच्या; संध्याकाळी घरी आणल्या जायच्या. एखाद्या दिवशी म्हशी धुवायचा कार्यक्रम व्हायचा. चोळून चोळून प्रत्येक म्हैस स्वच्छ धुतली जायची. धुतल्यानंतर प्रत्येक म्हैस ही ‘ब्लॅक ब्यूटी’ दिसायची. म्हशींना पाण्याचं फार प्रेम असल्यानं, तो दिवस त्यांच्यासाठी एखाद्या सोहळ्यासारखा असायचा. रोज पाहिली जाणारी म्हैस धुतल्यानंतर नवीनच वाटायची. तिची चकाकणारी कांती लोभस वाटायची. म्हशींना सकाळी आणि संध्याकाळी मोठी तगारीभर ढेप खाऊ घातली जायची. सरकीची ढेप महाग असली, तरी आपल्या म्हशीसाठी मालक ती आणायचे. सरकीच्या ढेपीची दोन-चार पोती आणून ठेवायला ते कधीच विसरायचे नाहीत. ज्यांच्याकडे म्हशी होत्या ते सगळेच स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय दक्ष राहायचे. त्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागायचे. गल्लीतल्या लोकांना अतिशय उत्तम प्रतीचं दूध मिळायचं. त्याचं तूपही रवाळ आणि उत्तम निघायचं.
एखाद्या म्हशीचं बाळंतपण हा सोहळाच असायचा. म्हैस सुखरूप बाळंत व्हावी, ही सगळ्यांची मनापासून इच्छा असायची. म्हशीच्या बाळंतपणानंतर गल्लीमध्ये सगळ्यांना कच्चं दूध अत्यंत प्रेमानं वाटलं जायचं आणि मग वेलदोड्याची पूड टाकलेल्या खरवसाच्या वड्या सगळे मनसोक्त खायचे. याबरोबरच उत्तम प्रतीचं ओशट ताकही गल्लीतल्या सगळ्या लोकांना मिळायचं. एखाद्या बाळंतिणीची ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते; तशीच काळजी त्या म्हशींची घेतली जाई. म्हशीचं पारडू हे काही दिवसांसाठी मोठं आकर्षण असायचं.
माझ्या लहानपणी म्हशीच्या शेणानं घर सारवत असत. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीप्रमाणेच म्हशीचे मालक तिची काळजी घ्यायचे. गल्लीतल्या सर्व म्हशी कायमच्या शेतात किंवा मळ्यात गेल्यानंतर गल्ली काही दिवस ओकीबोकी वाटली. म्हैस असलेलं प्रत्येक घर एवढे कष्ट करूनही अतिशय आनंदात राहायचं. आमच्या गल्लीला असलेलं ‘ म्हशींची गल्ली ’ हे संबोधन आम्हाला मानाची पदवी वाटायची आणि आजही वाटते. आज गल्लीचं रूप बदललं आहे. नव्या इमारतींनी गल्ली सजली आहे. आमच्या मनात तेव्हाच्या आठवणी ताज्या आहेत.











