फुले वाड्यात वटपूजन नको

महाराष्ट्र टाइम्स

वटपौर्णिमेला फुले वाड्यासमोरील वडाच्या पूजेला मज्जाव करण्याची मागणी पुरातत्व विभागाने केली आहे. महात्मा फुले वाडा हे राज्य संरक्षित स्मारक असल्याने तेथे कर्मकांडांना परवानगी नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. २९ जून रोजी होणाऱ्या वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

फुले वाड्यात वटपूजन नको
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

वटपौर्णिमेच्या दिवशी स्थानिक महिला येथील वडाची पूजा करतात. त्यासाठी येथे मोठी गर्दी असते. फुले दाम्पत्याने आपले संपूर्ण आयुष्य समाजसुधारणेसाठी खर्ची घातले असून, कर्मकांडाला विरोध केला आहे. मागील वर्षी येथे हाच प्रकार झाला, त्याला ‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’च्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिस प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. यंदा असा प्रकार घडू नये, यासाठी प्रशांत फुले यांनी पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयाला विनंती केली होती, असे या पत्रात नमूद आहे.

महात्मा फुले पेठेतील (गंज पेठ) महात्मा फुले वाडा या राज्य संरक्षित स्मारकासमोरील वडाची येत्या वटपौर्णिमेला पूजा करण्याला मज्जाव करावा आणि वाड्याभोवती पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी पुरातत्त्व विभागाने पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्य पुरातत्त्व विभागाचे पुणे विभागीय सहायक संचालक डाॅ. विलास वाहणे यांनी हे पत्र पाठवले आहे. येत्या २९ जून रोजी वटपौर्णिमा आहे. फुले वाड्यासमोरच वडाचे झाड आहे. हा वाडा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला असून, तो पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. या स्मारकाला भेट देण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक-अभ्यासक येतात. हे स्मारक अत्यंत संवेदनशील या गटात मोडते.

‘महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुराणवस्तू शास्त्रविषयक स्थळे आणि अवशेष नियमानुसार स्मारकाला लागू असलेल्या किंवा त्यात पाळण्यात येणाऱ्या कोणत्याही चालीरीतींचे, वहिवाटीचे किंवा रूढींचे उल्लंघन करता कामा नये, यासाठी २९ जून रोजी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत पोलिस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी या पत्राद्वारे पुरातत्त्व विभागातर्फे करण्यात आली आहे.