माशांच्या बेगमीलाही इराण युद्धाची झळ

महाराष्ट्र टाइम्स

इराण युद्धाचा फटका आता मच्छिमारांना बसत आहे. डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे मासेमारीवर आर्थिक संकट आले आहे. मासे मिळण्याचे प्रमाण घटले असून, वाढत्या खर्चामुळे गुंतवणूक वसूल होण्याची चिंता आहे. मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या बोटींची संख्या कमी झाली आहे. कोळीवाड्यांमध्ये बेगमीच्या हंगामावर याचा परिणाम दिसू लागला आहे. मासेविक्रेत्यांनाही याचा फटका बसत आहे.

माशांच्या बेगमीलाही इराण युद्धाची झळ
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

इराण युद्धामुळे भडकलेल्या इंधनदरवाढीची झळ आता थेट मच्छिमारांना बसू लागली असून, त्याचा परिणाम यंदाच्या बेगमीच्या हंगामावर होण्याची चिन्हे आहेत. ३१ मेपासून मासेमारी बंद होण्यापूर्वी कोळीवाड्यांमध्ये मासे साठवणे, उन्हाळ्यात मासळी सुकवणे आणि पावसाळ्यासाठी बेगमी करून ठेवण्याची लगबग सुरू असते. मात्र डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे मच्छिमारांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

मच्छिमार सहकारी संस्थांना घाऊक दराने इंधन खरेदी करतानाही प्रतिलिटर ४० ते ५० रुपये अधिक मोजावे लागत असल्याची माहिती संघटनांनी दिली. आधीच समुद्रात मासे मिळण्याचे प्रमाण घटले असताना, वाढत्या इंधनखर्चानंतरही अपेक्षित मासेमारी होईल, याची खात्री नसल्याने गुंतवणूक वसूल होईल का, अशी चिंता मच्छिमारांना आहे. मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या बोटींची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. या प्रश्नावर सरकारकडे पाठपुरावा करूनही ठोस तोडगा निघालेला नसल्याची खंत मच्छिमार संघटनांनी व्यक्त केली.

वर्सोवा मच्छिमार संघटनेचे राजहंस टपके म्हणाले, ‘हा बेगमीचा महत्त्वाचा काळ असतो. राखीपौर्णिमेपर्यंत मासेमारी बंद राहणार असल्याने काही मासे साठवले जातात, तर काहींची निर्यात करून पावसाळ्यासाठी आर्थिक तजवीज केली जाते. मात्र युद्धाचे कारण देत वाढवलेले इंधनदर अद्याप कमी झालेले नाहीत. घाऊक खरेदीतही वाढीव दर आकारले जात आहेत.’

उन्हाळा वाढल्याने मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले असून, सागरी प्रदूषणामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. ‘पूर्वी मासेमारी व्यवसायात चांगला नफा मिळायचा; आता खर्चच जास्त वाढला आहे,’ अशी प्रतिक्रिया मासेविक्रेत्या वीणा कोळी यांनी दिली.