तमिळनाडूत अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

तमिळनाडू सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सहकारी बँकांकडून घेतलेले ५० हजार रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात आले आहे. मोठ्या शेतकऱ्यांनाही पाच हजार रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. या निर्णयामुळे १४.२२ लाख शेतकऱ्यांना लाभ होईल. आगामी लागवड हंगामासाठी हे कर्ज शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.

तमिळनाडूत अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी

तमिळनाडूत अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सहकारी बँकांकडून घेतलेले ५० हजार रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात आले आहे; तसेच मोठ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी सोमवारी यासंबंधित घोषणा केली.

या निर्णयाचा राज्यातील १४.२२ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार असून, सरकारवर दोन हजार ४४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. विजय यांनी २३ एप्रिल रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.

‘राज्य सरकारची सध्याची आर्थिक स्थिती, आर्थिक संसाधने आणि कठीण परिस्थिती लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी एक मे २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सहकारी बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची माफी करण्याचे आदेश दिले आहेत,’ असे सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सहकारी बँकांमार्फत पीक कर्ज घेतलेल्या इतर मोठ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची पीक कर्जमाफी देण्यात येईल. ‘ही पीक कर्जमाफी आगामी लागवड हंगामासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल,’ असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.