अण्णाद्रमुकला पुन्हा धक्का

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक पक्षात फूट पडली आहे. बंडखोर गटातील तीन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यांनी सत्ताधारी टीव्हीके पक्षात प्रवेश केला आहे. हे आमदार १३ मे रोजीच्या विश्वासदर्शक ठरावावेळी टीव्हीके सरकारच्या बाजूने मतदान करणारे होते. यामुळे अण्णाद्रमुक पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

rebel mlas of aiadmk join tvk amidst internal conflict

तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. बंडखोर गटातील तीन आमदारांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष जे. सी. डी. प्रभाकर यांच्याकडे आमदारकीचे राजीनामे सादर केले व सत्ताधारी टीव्हीके पक्षात प्रवेश केला.

सी. व्ही. षण्मुगम आणि एस. पी. वेलुमणी यांच्या नेतृत्वाखालील गटातील हे आमदार असून, उर्वरित पाच आमदारांनी मात्र पुन्हा पक्षप्रमुख एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये मदुरंतकमच्या मरगथम कुमारवेल, धारापूरमच्या पी. सत्यभामा आणि पेरुंदुराईचे एस. जयकुमार या आमदारांचा समावेश आहे.

राजीनाम्यानंतर या तिन्ही आमदारांनी टीव्हीकेचे मंत्री आधव अर्जुन यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीकेमध्येे प्रवेश केला. १३ मे रोजी झालेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी पक्षाच्या आदेशाविरोधात जाऊन टीव्हीके सरकारच्या बाजूने मतदान करणाऱ्या २५ आमदारांमध्ये या तिघांचा समावेश होता.