उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली असून, मुंबईच्या बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे फळभाज्यांबरोबरच पालेभाज्यांच्या दराने उसळी घेतली आहे. किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो असलेल्या भाज्या सध्या १२० ते १५० रुपये किलोच्या घरात पोहोचल्या असून, इंधन दरवाढीमुळे महागाईत भर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
मुंबई ‘एपीएमसी’ बाजारात सध्या दररोज भाज्यांच्या ५०० ते ५५० गाड्या येत असून, मालाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे भाज्यांची दरवाढ झाली आहे. घाऊक बाजारात फरसबी ८० ते १२० रुपये किलो झाली आहे. मटार ८० ते ९० रुपये, घेवडा ७० ते ९० रुपये, गवार ७० ते ८० रुपये, शेवगा शेंगा ७० ते ९० रुपये किलो आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात त्यांचे दर १२० ते १५० रुपये किलोवर पोहोचले आहेत. भेंडी, फ्लॉवर, कोबी, कारली या भाज्या घाऊक बाजारात ६० ते ८० रुपये किलो आहेत. किरकोळ बाजारात त्यांचे दर १०० ते १२० रुपये किलोवर गेले आहेत. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे दरही वाढले आहेत. दहा रुपयांना असणारी मेथी, पालक, शेपू घाऊक बाजारात १५ ते २० रुपये जुडी आहे. किरकोळ बाजारात या भाज्यांचे दर ३० ते ४० रुपये जुडी आहे.




