पक्षश्रेष्ठींनी मला २६ मे रोजी (आज, मंगळवारी) दिल्लीत बैठकीसाठी बोलावले आहे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी सांगितले. त्यामुळे राज्यात पुन्हा नेतृत्वबदल आणि मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. सिद्धरामय्या यांच्यासह उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनाही पक्षश्रेष्ठींनी त्याच दिवशी आमंत्रित केले आहे.
‘पक्षश्रेष्ठींनी मला दिल्लीला बोलावले आहे. उद्या सकाळी ११ वाजल्यापासून बैठक आहे. मात्र विषय काय आहे हे मला माहीत नाही. काल रात्री पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मला फोन करून तारीख आणि बैठकीबद्दल कळवले’, असे सिद्धरामय्या यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
कर्नाटक सरकारने २० मे रोजी तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर राज्यात नेतृत्वबदल आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसमधील अधिकृत सूत्रांनुसार, काँग्रेस पक्षश्रेष्ठी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील नेतृत्वसंघर्षावर तोडगा काढण्याबाबत चर्चा करतील असे मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहे. तरीही, कर्नाटकातून राज्यसभेच्या चार जागांसाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. चारपैकी तीन जागा काँग्रेस जिंकू शकते. राज्यातील ‘एसआयआर’ अंमलबजावणीचाही बैठकीत उल्लेख होऊ शकतो.




