जुहू किनाऱ्याला अवैध पार्किंगचा विळखा

महाराष्ट्र टाइम्स

जुहू किनाऱ्यावर वाहनांची बेकायदेशीर पार्किंग वाढली आहे. यामुळे स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना त्रास होत आहे. तक्रारीनंतरही तात्पुरती कारवाई होते. ट्रक, टेम्पो, रिक्षा किनाऱ्यावर दिवसरात्र उभ्या असतात. यामुळे परिसराचे स्वरूप बदलले आहे. क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनाही अडथळा येत आहे. या गंभीर समस्येवर संबंधित यंत्रणा लक्ष देणार आहे.

जुहू किनाऱ्याला अवैध पार्किंगचा विळखा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मुंबईकरांसाठी मोकळा श्वास घेण्याची जागा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांवर आता अवैध पार्किंगचा विळखा वाढू लागला आहे. जुहू कोळीवाडा परिसरातील किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाहन पार्किंगमुळे स्थानिक नागरिक, प्रभातफेरी करणारे ज्येष्ठ आणि खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर तात्पुरती कारवाई होते, परंतु पुन्हा अवघ्या काही तासांत गाड्या येथे पार्क केल्या जातात, अशी स्थानिकांची तक्रार आहे.

सुनील दत्त उद्यानालगतच्या गल्लीत पूर्वी मर्यादित प्रमाणात वाहने उभी राहत होती. मात्र गेल्या काही महिन्यांत या पार्किंगचा विस्तार थेट किनाऱ्यावरील भरतीच्या रेषेपर्यंत झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ट्रक, टेम्पो, रिक्षा आणि भंगार वाहतूक करणाऱ्या वाहनांसह विविध गाड्या दिवस-रात्र किनाऱ्यावर उभ्या राहत असल्याने परिसराचे स्वरूपच बदलले आहे. या किनाऱ्यावरील पार्किंगची बदललेली स्थिती गुगल अर्थसारख्या माध्यमातूनही स्पष्ट दिसते.

स्थानिक नागरिकांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी केल्यानंतर काही काळ कारवाई होते; गाड्या तास-दोन तास गायब होतात आणि पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होत आहे, अशा तक्रारी जुहू कोळीवाडा येथे फिरायला आणि खेळायला येणारे नागरिक करत आहेत. किनाऱ्यालगत क्रिकेटसाठी तयार करण्यात आलेल्या पीचजवळही वाहने उभी राहत असल्याने खेळणाऱ्या मुलांना सतत अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणेला पत्र पाठवून परिस्थितीची माहिती देण्यात येणार असल्याचे सांताक्रूझ वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलीम तांबोळी यांनी सांगितले.