छोटे खाद्यविक्रेते ‘गॅस’वर!

Contributed byसमीक्षा राणेsamiksha.rane@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईतील वडापाव, चहा टपऱ्या आणि खाद्यगाड्या चालवणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर गॅस दरवाढीचे मोठे संकट आले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने त्यांचा नफा कमी झाला आहे. ग्राहक टिकवण्यासाठी दर वाढवणे शक्य नसल्याने हे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या या टपऱ्यांसमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.

छोटे खाद्यविक्रेते ‘गॅस’वर!

मुंबई ः पहाटेची लोकल पकडण्यासाठी घरातून लवकर निघणारा किंवा दिवसभर काम केल्यानंतर पोटात पडलेली आग शमवण्यासाठी वडापाव-भजीपावाच्या गाडीवर थांबणारा मुंबईकर... वाफाळत्या कटिंग चहाच्या टपरीभोवती जमलेली गर्दी आणि बाजूलाच तळला जाणारा, खमंग वासाने भूक वाढवणारा वडा-पाव मुंबईच्या दैनंदिन जीवनातील हे परिचित दृश्य़ अजूनही तसेच दिसत असले, तरी त्यामागचे आर्थिक गणित मात्र पूर्णपणे बदलू लागले आहे. व्यावसायिक गॅससिलिंडरचे दर वाढू लागल्याने शहरातील छोट्या खाद्यगाड्या, चहाच्या टपऱ्या आणि वडा-पाव विक्रेत्यांचा नफा अक्षरशः आटत चालला आहे. ग्राहक टिकवण्यासाठी दर वाढवणे टाळले जात असले, तरी वाढत्या खर्चामुळे ‘धंदा सुरू आहे; पण हातात उरतेय काय?’, हा प्रश्न छोट्या विक्रेत्यांना सतावत आहे.

मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत एप्रिलमध्ये २,०३१ रुपये होती. मात्र १ मेपासून ती थेट ३,०२४ रुपयांवर पोहोचली. म्हणजेच एका सिलिंडरमागे तब्बल ९९३ रुपयांची वाढ झाली आहे. आधीच खाद्यतेल, दूध, चहा पावडर, बटाटा, पाव आणि डिस्पोजेबल साहित्याच्या वाढत्या किमतींनी छोट्या व्यावसायिकांचे बजेट कोलमडले असताना, गॅसदरवाढीने त्यांची अडचण आणखी तीव्र केली आहे.

अंधेरीत गेली दहा वर्षे वडा-पाव आणि भजी विकणारे संजय कदम म्हणतात, ‘पूर्वी महिन्याला चार सिलिंडरमध्ये काम भागायचे. त्यासाठी आठ-नऊ हजार रुपये खर्च यायचा. आता तोच खर्च १२ हजारांच्या पुढे गेला आहे. पण वडा-पावाचे दर वाढवले, तर ग्राहक लगेच दुसरीकडे वळतो. त्यामुळे किंमत वाढवण्याची भीती वाटते.’

विशेष म्हणजे, ग्राहकांवर थेट भार टाकण्यास बहुतांश विक्रेते अजूनही तयार नाहीत. ‘रोज येणारा ग्राहक दोन रुपयांचाही हिशोब करतो. दर वाढवले, तर गर्दी कमी होते,’ असे अनेक विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महागाईचा मोठा फटका हे छोटे व्यावसायिक स्वतःच्या नफ्यातून सहन करत आहेत. मुंबईच्या खाद्यसंस्कृतीतील वडा-पाव, कटिंग चहा आणि नाश्त्याच्या गाड्या या केवळ व्यवसाय नाहीत, तर शहराच्या वेगवान जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत. मात्र वाढत्या व्यावसायिक गॅसदरांनी आता या टपऱ्यांमागची धग अधिकच तीव्र केली असून, ‘दर वाढवायचे की ग्राहक टिकवायचे?’ हा प्रश्न प्रत्येक छोट्या विक्रेत्यासमोर उभा ठाकला आहे.