जळगावात पामोलिन तेलापासूनकृत्रिम दूध; संशयितास अटक

महाराष्ट्र टाइम्स

धरणगाव येथे पामोलिन तेलापासून कृत्रिम दूध बनवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोमनाथ माळी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी पैशांच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळत होता. त्याने तयार केलेले कृत्रिम दूध मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. या भेसळयुक्त दुधामुळे लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.

जळगावात पामोलिन तेलापासूनकृत्रिम दूध; संशयितास अटक
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पैशांच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार धरणगाव येथे उघडकीस आला आहे. रिफाइंड पामोलिन तेलापासून कृत्रिम दूध तयार करून ते चांगल्या दुधात मिसळत विक्री करणाऱ्या भेसळखोराचा धरणगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सोमनाथ माळी (वय ३२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील सोमनाथ माळी हा स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हा गोरखधंदा करत असल्याचे समोर आले आहे. संशयित सोमनाथ माळी हा रिफाइंड पामोलिन तेलाचा वापर करून रासायनिक प्रक्रियेद्वारे हुबेहूब दुधासारखे दिसणारे कृत्रिम दूध तयार करत होता. हे घातक कृत्रिम दूध तो चांगल्या दुधात मिसळायचा, जेणेकरून दुधाचे प्रमाण वाढेल. हे भेसळयुक्त दूध अस्सल दूध म्हणूनच बाजारात विकले जात होते. हे रासायनिक आणि कृत्रिम दूध मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. या दुधाच्या सेवनाने नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता.