मराठी नामफलक न लावणाऱ्या दुकानांसह विविध आस्थापनांविरोधात मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. १४ मेपासून सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त आस्थापनांनी मराठी नामफलक लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. गिरगाव, मलबार हिल, कुलाबा, फोर्ट, अंधेरी जोगेश्वरी आणि विलेपार्ले या भागांतील पश्चिम परिसरात सर्वाधिक आस्थापनांनी आदेशाचे उल्लंघन केले असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, त्यांच्याविरोधात दंडासह कायदेशीर कारवाई होणार आहे. ही मोहीम १३ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.
मराठी नामफलक लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर २०२३ ला संपुष्टात आल्यानंतर मुंबई महापालिकेने २८ नोव्हेंबर २०२३ पासून मराठी नामफलक न लावणाऱ्या दुकानदारांसह अन्य आस्थापनाविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली. देवनागरी लिपीत मराठीत ठळक अक्षरात नामफलक लावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबईत दुकाने, हॉटेल, थिएटर आणि व्यावसायिक मालमत्ता मिळून १० लाख ८३ हजार २५१ दुकाने व आस्थापना आहेत. मुंबई महापालिकेने प्रत्येक वॉर्डात दोन याप्रमाणे २४ वॉर्डांत ४८ अधिकारी आस्थापनांची झाडाझडती घेण्यासाठी नेमले. दुकानांवर मराठीत नामफलक नसल्यास प्रति कामगार दोन हजार रुपये दंड किंवा न्यायालयीन कारवाईची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यानुसार दंडात्मक कारवाईही केली जात आहे.
नोव्हेंबर २०२३ पासून ते मार्च २०२६ पर्यंत महापालिकेच्या दुकाने आणि आस्थापना विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १ लाख ५८ हजार ११६ आस्थापनांना भेटी दिल्या असून १ लाख ५३ हजार ०९६ आस्थापनांनी मराठी नामफलक लावल्याचे निदर्शनास आले. तर ५,०२० आस्थापनांनी मराठी नामफलक लावले नाहीत. त्यामुळे मराठी नामफलकाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांविरोधात विशेष मोहीम घेऊन पुन्हा कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. तसे निर्देश महापालिका विधी समिती अध्यक्ष दीक्षा कारकर यांनी महापालिका दुकाने व आस्थापना विभागाला दिले. त्यानुसार १४ मे पासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत ३३,२५७ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या असून नामफलक नसलेल्या १०२३ आस्थापना आढळल्या आहेत. त्यांना नोटीस बजावली आहे. ए वॉर्ड असलेल्या कुलाबा, फोर्ट, नरीमन पॉइंट परिसरातील ११३ आस्थापनांवर मराठी नामफलक न आढळणे, आस्थापनेचे मराठी नाव लहान, तर इंग्रजीत मोठ्या अक्षरात असल्याचे निदर्शनास आले. त्यापाठोपाठ डी वॉर्ड असलेल्या गिरगाव, मलबार हिल, वाळकेश्वर भागात ४६ आस्थापनांनी मराठी नामफलक लावले नसल्याचे निदर्शनास आले. याशिवाय गोरेगाव या पी दक्षिण वॉर्डमध्ये ९१, मोहम्मद अली, डोंगरी, भेंडी बाजार या बी वॉर्डमध्ये ९२, एच पश्चिम वॉर्डच्या वांद्रे, खार, सांताक्रुझ पश्चिममधील ५४, बोरीवली या आर मध्य वॉर्डमध्ये ४३, अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले भाग असलेल्या के पश्चिम वॉर्डमध्ये ४४ आस्थापनांनीही मराठी नामफलकाकडे दुर्लक्षच केले आहे. विधी समिती अध्यक्ष दीक्षा कारकर यांनी, ही मोहीम १३ जूनपर्यंत सुरू राहणार असून दुसरा टप्पा सुरू होईल. यासंदर्भात महापालिका आयुक्तांसोबतही चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले.








