मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज पाटील जरांगे शनिवारपासून (दि. ३०) अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण करणार आहेत. पत्रकार परिषदेत जरांगे यांनी ही माहिती दिली.
आता फक्त अंमलबजावणी पाहिजे, चर्चा करणार नाही. हैदराबाद, सातारा गॅझेट लागू करावे, १९९० आणि १९९४ मध्ये जसे ओबीसी आरक्षण दिले तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे, तीच नियमावली लागू करावी. १९६७ पासून आतापर्यंत मराठा समाजाचे नुकसान होत आहे. आमचा अनुशेष कोण भरून काढणार? आमच्या पाच पिढ्यांचे नुकसान झाले आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे, असा शासनाचा आदेश काढा. आता आरपारची लढाई आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.
आपण कठोर बेमुदत उपोषण करणार आहोत. उन्हात एका बाजेवर बसून उघड्यावर उपोषण करणार असून, पायात चप्पल घालणार नाही, डोक्यावर मंडप नसेल, पाणी पिणार नाही, असेही जरांगे म्हणाले. त्याच वेळी मराठा समाजाने अंतरवाली सराटीत येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. मराठा समाजाचे मन जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी आहे. त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी जरांगे यांनी केले.








