मुंबई : भारतीय विमान कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत उड्डाणांची संख्या कमी केल्यानंतर येत्या काळात खर्चात कपात करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जाणार, याची चिंता या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे. वैमानिक आणि केबिन क्रू यांच्यावरही परिणाम होऊ शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. वेतन कपात, विनापगारी रजा, दीर्घमुदतीची रजा असेही याचे स्वरूप असू शकते, असा अंदाज आहे.
एअर इंडियासारख्या कंपनीने आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांपाठोपाठ दोन आठवड्यांमध्ये देशांतर्गत सेवेच्या संख्येमध्येही घट केली. एअर इंडियाने उड्डाणांमध्ये २० ते २२ टक्के कपात केल्याचे समोर आले आहे. इंडिगोच्या सेवांमध्येही फेररचना केली जाईल, अशी चर्चा आहे. जूनच्या मध्यापासून इंडिगोच्या उड्डाणांमध्ये ही कपात लागू होऊ शकते. पश्चिम आशियातील सध्याची युद्धाची परिस्थिती आणि इंधनामध्ये झालेल्या दरवाढीच्या अनिश्चित परिस्थितीमध्ये विमानोड्डाणांमध्ये येत्या काळात आणखी बदल होऊ शकतात. अशा परिस्थितीत कमी झालेली उड्डाणे, कमी झालेले उड्डाणांचे तास या पार्श्वभूमीवर वैमानिक आणि केबिन क्रू यांच्या कामाच्या तासांमध्येही घट होऊ शकते. ही घट सध्या वैमानिकांवरील ताण कमी करण्यासाठी साह्यभूत ठरू शकत असल्याचेही वैमानिक सांगत आहेत. उड्डाणे कमी झाल्यानंतर कामाचे तास किती कमी होतील, याचा अंदाज येत्या काळात येईल. इतर वेळी अतिरिक्त कामाच्या तासांसाठी मिळणारे वेतनही (ओव्हरटाइम) कमी होऊ शकते.
या परिस्थितीचा फटका सर्वात आधी केबिन क्रूला बसू शकतो, असे मत ‘फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स’चे अध्यक्ष कॅप्टन सी. एस. रंधावा यांनी व्यक्त केले.
विमान कंपन्यांना सर्वाधिक खर्च विमाने भाड्यावर घेणे आणि इंधनावर करावा लागतो. उड्डाणांमध्ये होणाऱ्या कपातीमुळे विमाने भाड्यावर घेण्याचा खर्चही कमी करण्याचा विचार होऊ शकतो. ताफ्यातील विमानांची संख्या कमी झाली तर स्वाभाविकपणे त्यानुसार कर्मचारी संख्या कमी करण्याचाही विचार होऊ शकतो. ही परिस्थिती सध्या निर्माण झालेली नसली तरी येत्या काळात ती निर्माण होणार नाही, याचीही खात्री देता येत नसल्याचे हवाई वाहतूक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.








