नसरापूर येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात पुण्याच्या विशेष न्यायालयात गुरुवारी आरोप निश्चित करण्यात आले. या प्रकरणात दाखल आरोपपत्र आणि आरोपीविरोधातील पुरावे आरोप निश्चित करण्यासाठी भक्कम असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले असून, या खटल्याची आजपासून (शुक्रवार) दररोज 'इन-कॅमेरा' सुनावणी घेण्याचे आदेश दिले. दरम्यान, आरोपी मानसिकदृष्ट्या सुदृढ असल्याचा वैद्यकीय अहवाल आणि या खटल्यातील एकूण ८२ साक्षीदारांची यादी सरकार पक्षातर्फे न्यायालयात सादर करण्यात आली.
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याला गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले. आरोपीने एक मे रोजी दुपारी तीन ते चारच्या सुमारास चिमुकलीला गाठीशेव देतो आणि गायीचे वासरू दाखवितो असे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. तिला गोठ्याशेजारच्या शेडमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक व अनैसर्गिक अत्याचार केला. तिच्या तोंडात बोळा कोंबून छातीवर मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा घटनाक्रम विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात सांगितला.
आरोपी पीडित मुलीला घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसत आहे. आरोपी आणि पीडितेला एकत्र पाहणाऱ्या लहान मुले आणि ग्रामस्थांनी पोलिस व न्यायालयासमोर जबाब नोंदविले आहेत. ओळख परेडमध्ये साक्षीदारांनी आरोपीला ओळखले आहे. आरोपी लैंगिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचा वैद्यकीय अहवाल, डीएनए चाचणी व न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा, आरोपीच्या कबुलीजबाबावरून हस्तगत मुद्देमाल आदी पुरावे आणि एकूण ८२ साक्षीदारांची यादी त्यांनी न्यायालयात सादर केली. आरोपीविरोधात दाखल गुन्ह्याची कलमे सिद्ध करणारे भक्कम साक्षीदार, कागदोपत्री आणि परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी उपलब्ध असून, आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्याची विनंती ॲड. मिसर यांनी केली. त्यांना ॲड. सुरेश गायकवाड आणि ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी सहकार्य केले.
विधी साह्य संरक्षण वकील हिंमतराव सुर्यवंशी यांनी आरोपीची बाजू मांडली. अपहरण, विनयभंग आणि खून सिद्ध करण्याइतका ठोस पुरावा आरोपपत्रात नाही; तसेच 'लास्ट सीन टुगेदर' व न्यायवैद्यक पुरावेही योग्य नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला. आरोपीला आरोप वाचून दाखविल्यावर त्याने ते नाकारल्याने न्यायालयाने या खटल्याची दररोज सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार कलम १३७ (२) (अपहरण), १४० (१) (अपहरण करून खून), कलम ६४ (बलात्कारासाठी शिक्षा), ६५ (२) (बारा वर्षांखालील मुलीवर बलात्कार), कलम १०३ (१) (खून), कलम ७४ (विनयभंग) आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) चार, पाच, सात, अकरा आणि बारा या कलमांनुसार आरोप निश्चित करण्यात आले.









