आधी जनगणना, मगच प्रशिक्षण

महाराष्ट्र टाइम्स

राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणापूर्वी जनगणना आणि बीएलओची कामे पूर्ण करण्याचे आदेश मिळाले आहेत. २ जून ते १२ जून २०२६ दरम्यान हे प्रशिक्षण होणार आहे. मात्र, या राष्ट्रीय कामांमुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. शिक्षण विभागाने सर्व संबंधित विभागांना या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा वाढला आहे.

आधी जनगणना, मगच प्रशिक्षण
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

वरिष्ठ व निवड श्रेणी वेतनश्रेणीसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना प्रशिक्षणापूर्वी जनगणना , ‘बीएलओ’ आणि इतर राष्ट्रीय कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. ‘आधी जनगणना आणि शासकीय कामे पूर्ण करा, मगच प्रशिक्षणाला या’, अशा स्वरूपाच्या सूचनाच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) देण्यात आल्या आहेत.

वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण २ जून ते १२ जून २०२६ या कालावधीत विभागस्तरीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. पोर्टलवर नोंदणी केलेल्या शिक्षकांना प्रशिक्षणासाठी पात्र ठरविण्यात आले असले, तरी त्याआधी प्रलंबित राष्ट्रीय कामे पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

सध्या अनेक शिक्षकांकडे जनगणना, ‘बीएलओ’ तसेच इतर शासकीय जबाबदाऱ्या आहेत. ही सर्व कामे २ जूनपूर्वी पूर्ण करूनच प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे, अशा सूचना ‘एससीईआरटी’ने विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक तसेच नगरपालिका आणि महानगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केल्या आहेत. परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. हे आदेश शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, आदिवासी विकास, समाज कल्याण आणि बहुजन कल्याण विभागातील शिक्षकांनाही लागू असणार आहेत. त्यामुळे आधीच विविध अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकांमध्ये असंतोष वाढला आहे.