मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सावरकर जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट करीत अप्रत्यक्षपणे भाजपसह सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांना सावरकर खरोखरच समजले आहेत का, असा प्रश्न त्यांनी केला आहे. प्रत्येक गोष्ट तर्क व विज्ञानाच्या कसोटीवर स्वतः तपासून बघणे हीच सावरकरांना खरी श्रद्धांजली असल्याचे ते म्हणाले.
‘सावरकरांच्याच महाराष्ट्रात आज व्हाट्सअप विद्यापीठातील खोट्या गोष्टी न तपासता खऱ्या मानण्याची चढाओढ लागली आहे. राजकारणी भोंदू बाबांच्या भजनी लागले आहेत. उत्सव आणि डीजेमध्ये जनतेला गुंतवून ठेवले जात आहे. सावरकर प्रखर हिंदुत्ववादी होते, पण धर्मातील दोषांवर टीका करण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. मात्र आज त्यांच्याच नावाने धर्मात तेढ पसरवली जात आहे. ज्यांनी जातिअंताचा लढा दिला त्या महाराष्ट्रात जातीवरून हिंसाचार होतो आहे आणि सत्ताधारी त्याला खतपाणी घालत आहेत’, असे राज यांनी म्हटले आहे.
‘गेल्या दोन महिन्यांत मी दोन भाषणांमधून महाराष्ट्राची वैचारिक समृद्धी सादर करत असल्याचे सांगून राज ठाकरे म्हणाले की, आपण कोण होतो हेच विसरलो तर मार्ग आखणार कसा? सत्तेसाठी आसुसलेले राजकारण्यांच्या खोट्या नॅरेटिव्हवर अवलंबून राहिलो तर महाराष्ट्राचे कठीण आहे.’








