मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी धावपळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यापीठाने ऑनलाइन अर्ज नोंदणीस ३० मे, २०२६पर्यंत मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांना आता आणखी काही दिवसांची उसंत मिळणार आहे.
मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि इतर विद्याशाखांतील विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकात मात्र कोणताही बदल होणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार ३ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, त्यानंतर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रथम आणि द्वितीय गुणवत्ता यादी तसेच आनुषंगिक प्रवेश प्रक्रिया पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच पार पडतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर विभागांमध्ये आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये पहिल्यांदाच पदवीच्या चौथ्या वर्षासाठी ‘ऑनर्स’ आणि ‘ऑनर्स विथ रिसर्च’चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना एक वर्षीय पीजी डिप्लोमा, दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी तसेच चौथ्या वर्षातील ‘ऑनर्स’ आणि ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार आहे. पदवीची तीन वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षासाठी प्रवेशाची संधी मिळणार असून, राज्यातील तसेच राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनाही या शैक्षणिक पर्यायाचा लाभ घेता येईल.









