दुसरीत बेपत्ता झालेलामुलगा १२ वर्षांनी घरी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मालाड पोलिसांनी १२ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या कमरुद्दीन खानला शोधून काढले. दुसरीत नापास झाल्यावर तो घरातून निघून गेला होता. भिक्षेकर म्हणून वावरताना पोलिसांना तो सापडला. आईवडिलांना भेटल्यावर तो ढसाढसा रडला. मासेमारी बंदी, महाराष्ट्र सदनातील कामांची दिरंगाई, गावठी बॉम्बने मुलगा जखमी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नामांतर आणि सोन्याच्या चोरीच्या घटनाही घडल्या आहेत.

missing boy returns home after 12 years

मुंबई : मुंब्रा येथे राहणाऱ्या एका कुटुंबाला मालाड पोलिसांनी ईदची अनोखी भेट दिली आहे. दुसरीत नापास झाल्यामुळे घराबाहेर पडलेला मुलगा पुन्हा घरी परतलाच नाही. मातापित्यांनी जंग जंग पछाडले तरीही तो सापडला नाही. अखेर भिक्षेकारांविरुद्ध कारवाईत पोलिसांच्या नजरेने त्याला ओळखले आणि १२ वर्षांपासून ताटातूट झालेल्या आईवडिलांची त्यांच्या मुलासोबत भेट घडवून आणली. वीस वर्षांचा कमरुद्दीन खान आपल्या आईवडिलांना पाहून ढसाढसा रडला आणि पोलिस ठाण्यात असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले.

मासेमारी बंदी

मुंबई : मासळीच्या साठ्याचे जतन, तसेच मच्छीमारांच्या जीवित आणि वित्त रक्षणाच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार, १ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिक आणि यंत्रचलित मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

‘कामे पूर्ण करा’

मुंबई : ‘महाराष्ट्र सदनातील कामांमध्ये होत असलेली अनावश्यक दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. सदनाची प्रलंबित कामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण करा’, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच अधिकाऱ्यांना दिली. या कामांत कोणत्याही प्रकारची हलगर्जी आणि निष्काळजी खवपून घेणार नाही, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचे समजते.

स्फोटात मुलगा जखमी

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब हातात फुटल्याने प्रणव प्रताप येसरे (वय १३) गंभीर जखमी झाला. या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रणव गुरे राखण्यासाठी परिसरात गेला असताना त्याला शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब आढळला. उत्सुकतेपोटी तो हाताळत असताना अचानक त्याचा स्फोट झाला. स्फोटानंतर तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला.

‘मागणी २०१४ पासूनची’

मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नामांतर अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय उद्यान करण्यासोबतच तिथे अटल बिहारी वाजपेयी जागतिक विद्यापीठ उभारण्याबाबतचा प्रस्ताव सध्या प्रचंड चर्चेत आहे. या नामांतराच्या प्रस्तावाला अनेक पर्यावरणप्रेमी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. नामांतराची ही मूळ मागणी पंडित यशोदव एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आर.डी. झा यांनी प्रथम २०१४ मध्ये केली होती. त्यानंतर २०२४ मध्ये तिथे जागतिक विद्यापीठ उभारण्यासंदर्भात मागणी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आली होती.

डोंगरावर चोरीचे सोने

मुंबई : चारकोप येथील दागिने घडविण्याच्या कारखान्यातून कोट्यवधी रुपयांच्या सोने चोरीप्रकरणी चारकोप पोलिसांनी नुकतीच दोघांना अटक केली. सफीर चौधरी आणि वकार हुसेन अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी चोरलेल्या सोन्यापैकी सुमारे दीड कोटी रुपयांचे सोने हस्तगत केले असून हे सोने त्यांनी काश्मीरमधील डोंगरावरील जंगलात लपवून ठेवले होते.