पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास पोर्शे कारने मोटारसायकलला मागून जोरदार धडक देत अन्वैश अवधिया आणि अश्विनी कोटा या दोन तरुण आयटी इंजिनीअरचा बळी घेतला. या प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याचा मुलगा वेदान्त याला अटक झाली. महिन्यापूर्वी त्याला न्यायालयाने काही अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला. घरी येताच संपूर्ण अग्रवाल कुटुंबीयांनी नातेवाईक आणि मित्र परिवारासह जोरदार पार्टी करून सुटकेचे सेलिब्रिशन केले. संतापजनक बाब म्हणजे व्हिडीओमध्ये विशाल अग्रवाल गळ्यात नोटांचा हार घालून पैशांचा माज दाखवताना दिसत आहे. या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना अजून न्यायही मिळालेला नाही. श्रीमंतांना झटपट न्याय आणि गरिबांना 'तारीख पे तारीख' अशी खासियत असलेली आपली न्यायव्यवस्था योग्य भूमिका घेईल का?
- प्रदीप खोलमकर, नाशिक
रिंग रोड का हवा?
सध्या रिंग रोडसाठीचे भूसंपादन ऐरणीवर आले आहे. बाधित शेतकरी आंदोलन व आता तर उपोषण या मार्गाने विरोध करीत आहेत. दुसरीकडे सरकारही रिंग रोडसाठी हट्टाला पेटले आहे. खरा प्रश्न असा आहे, की सिंहस्थासाठी हा रोड प्रचंड खर्च करून व शेतकऱ्यांचा विरोध झेलून बांधणे आवश्यक आहे का? सिंहस्थानंतर त्या रोडची उपयुक्तता कायम राहील का? याबाबत काही सर्वेक्षण झाले आहे का? तसेही एका वर्षात रिंग रोडचे काम पूर्ण करणे अवघडच आहे. तेव्हा सरकारने सर्व बाजूंनी विचार करावा व रिंग रोडचा प्रस्ताव रद्द करावा. सरकारचे भरपूर पैसे वाचतील.
- जयंत भांडारी, नाशिक
दाहकता इंधनटंचाईची...
‘रांगेतील रख्ख मराठवाडा’ (मटा : २६ मे) या लेखात मराठवाड्यातील इंधनटंचाईचे दाहक वर्णन वाचले. पश्चिम आशियातील युद्धामुळे इंधनटंचाई, वाहतूक दरवाढ, पर्यायाने आवश्यक वस्तूंची भाववाढ झाली. हंगामातील शेतीकामे सोडून शेतकऱ्यांना डिझेलसाठी पंपावर थांबावे लागते. इंधनासाठी वादावादी, वाहन कागदपत्रांची मागणी, वाहनातच डिझेलची सक्ती यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो. इंधनाअभावी पर्यटकांची व भाविकांची रस्त्यावर उभी वाहने, शेतात, गावात उभे ट्रॅक्टर, पंपावर इंधनासाठी लांबच लांब रांगा, इंधनासाठी वाद काहीसे चित्र आहे. पाकिस्तानातील परिस्थितीशी तुलना करून ही परिस्थिती आटोक्यात येणार नाही. प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे; अन्यथा अनागोंदी वाढतच जाईल.
- सोपान खेडकर, नाशिक





