प्रवासीच निघाला लुटारू

महाराष्ट्र टाइम्स

वागळे इस्टेटमध्ये एका रिक्षाचालकाला प्रवाशाने गुंगीचे औषध पाजले. प्रवाशाने दिलेल्या ज्यूसमुळे रिक्षाचालक झोपी गेला. याच संधीचा फायदा घेत प्रवाशाने रिक्षाचालकाच्या गळ्यातील २३ ग्रॅम सोन्याची साखळी आणि बॅग चोरली. रिक्षाचालक जागा झाल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

traveler robber looted taxi driver

प्रवाशाने एका रिक्षाचालकाला गुंगीकारक पदार्थ असलेला ज्यूस देऊन रिक्षाचालकाच्या गळ्यातील साखळी लांबवली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वागळे इस्टेटमधील रस्ता क्र. २८ परिसरात ५७ वर्षांचे रिक्षाचालक राहतात. ते मंगळवारी दुपारी तीन हात नाका येथे भाड्याची प्रतीक्षा करत थांबले होते. त्यावेळी एक व्यक्ती कासारवडवली येथे जाण्यासाठी रिक्षात बसला. ही रिक्षा घोडबंदरच्या दिशेने निघाली असताना प्रवाशाने चार ज्यूसच्या बाटल्या विकत घेतल्या. सासरवाडीला धोंड्याचे जेवण करून येतो. पुन्हा मला ठाणे रेल्वे स्थानक येथे जायचे आहे, असे सांगून तो प्रवासी आपली बॅग रिक्षात ठेवून निघून गेला. जाताना त्याने रिक्षाचालकाला आपल्याकडील एक ज्यूसची बाटली दिली.

प्रवाशाची वाट पाहताना ज्यूस रिक्षाचालक प्यायला. ज्यूस प्यायलानंतर त्याला झोप लागली. ते रिक्षातच झोपले ते सायंकाळी ७.३० वाजता जागे झाले. जाग आल्यानंतर गळ्यातील २३ ग्रॅम सोन्याची साखळी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे प्रवाशाने रिक्षात ठेवलेली बॅगही जागेवर नसल्याचे दिसून आले. या प्रकरणी रिक्षाचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.