निवृत्त अधिकाऱ्याने गमावले ८९ लाख

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई महापालिकेच्या एका निवृत्त अधिकाऱ्याला कंपनीत गुंतवणूक करून चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले. सायबर चोरांनी एका महिलेच्या मदतीने अधिकाऱ्याची ८९ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. सुरुवातीला नफा दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर संकेतस्थळ आणि मोबाइल नंबर बंद झाल्याने फसवणूक उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवृत्त अधिकाऱ्याने गमावले ८९ लाख
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर चांगला परतावा मिळण्याचे प्रलोभन दाखवून सायबर चोरांच्या टोळीने मुंबई महापालिकेच्या एका निवृत्त अधिकाऱ्याची ८९ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यात राहणारे ६२ वर्षांचे तक्रारदार मुंबई महापालिकेत चांगल्या पदावर कार्यरत होते. चार वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. त्यांना एका महिलेचा फोन आला. तिने त्यांची संपूर्ण माहिती विचारली. नंतर ती त्यांच्या संपर्कात होती. व्हॉट्सॲपवर चॅटिंग करताना या महिलेने त्यांना एका कंपनीविषयी सांगितले. शिवाय, या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळतो, असे आमिष दाखवत एका संकेतस्थळाची लिंक पाठवली. या निवृत्त अधिकाऱ्याने या संकेतस्थळावर स्वत:ची माहिती भरली. तसेच, आयडी, पासवर्ड तयार केला. महिलेने पाठवलेल्या बँक खात्यावर तक्रारदाराने सुरुवातीला ५० हजार रुपये भरले. या गुंतवणुकीवर चांगला नफा झाल्याचे संबधित संकेतस्थळावर दाखवण्यात आले. त्यामुळे महिलेच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसला. त्यांनी टप्प्याटप्याने ८९ लाख रुपये गुंतवले. मात्र नंतर संबंधित संकेतस्थळ आणि महिलेचा मोबाइल नंबर अचानक बंद झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, या निवृत्त अधिकाऱ्याने चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार केली.