कळव्यातील मफतलाल कंपनीला टाळे लागून ३७ वर्षे झाली तरीही कंपनीच्या कामगारांना त्यांची हक्काची थकीत देणी अद्याप मिळाली नाहीत. अनेकांचे वय आता सत्तरीच्या पुढे आहे. आणखी किती दिवस देणी मिळावी यासाठी प्रतीक्षा करायची. आम्हाला न्याय मिळणार की नाही, असा संतप्त सवाल कामगारांनी केला आहे.
मफतलाल इंजिनीअरिंग कंपनी २७ मे, १९८९ रोजी बंद झाल्यानंतर या कंपनीतील शेकडो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. कंपनी बंद होऊन अनेक वर्षे झाली तरी कामगारांची कायदेशीर देणी प्रलंबित आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक कामगारांचे निधन झाल्याचे मफतलाल कामगार संघर्ष समितीचे म्हणणे आहे. थकीत देणीचा आकडा कोट्यावधी रुपयांच्या घरात असल्याचे समितीकडून सांगण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतरही कायदेशीर देणी देण्यास किंवा कंपनी पुन्हा सुरू करण्यास संबंधितांनी स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे १ फेब्रुवारी, १९९९ रोजी कंपनी मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर कंपनी परिसराला कुंपण घालण्यात आले. जागेच्या विक्रीसाठी तीन वेळा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली, मात्र एकाही विकासकाने प्रतिसाद दिला नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. नंतर हे प्रकरण 'डीआरटी' न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले. २०२४मध्ये पहिला लिलाव जाहीर केला, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली.
दरम्यान, ही कंपनी बंद होऊन ३८वे वर्ष लागल्याने बुधवारी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली ठाणे, बदलापूर, कल्याण, मुलुंडसह अन्य विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले शंभरच्या आसपास कामगार ठाण्यात एकत्र आले होते. लवकरात लवकर कामगारांची थकीत देणी मिळावी, अशी मागणी कामगारांनी केली.





