शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या आदिवासी समाजाला विनामूल्य मार्गदर्शन आणि कायदेशीर सल्ला देण्यासाठी अश्वमेध प्रतिष्ठानने मुरबाड तालुक्यात समुपदेशन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कायदेशीर प्रक्रिया, शासकीय ओळखपत्रे, दस्तऐवजांची उपलब्धता याविषयी आदिवासींना मार्गदर्शन करणे, हा या समुपदेशन केंद्रांचा मुख्य उद्देश आहे. मुरबाडमधील मासले बेलपाडा, सोनारपाडा आणि नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या भूमाता वनधन केंद्रात समुपदेशन सुविधा उपलब्ध असणार आहे. या उपक्रमातील पहिली कायदेशीर मार्गदर्शनपर कार्यशाळा सोमवार, १ जून रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अविनाश हरड यांनी दिली.
दस्तऐवजीकरण, शासकीय ओळखपत्रांचा अभाव, त्यासाठी लागणारी माहिती आणि जाणीव नसल्याने आदिवासी कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आदिवासी बांधव योजनांपासून वंचित राहतात. त्यांना मार्गदर्शन करणे, हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. ॲड. दिव्या ठाकूर केंद्रप्रमुख असतील. श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राचे कामकाज चालणार आहे. या समुपदेशन केंद्रात आदिवासींना विनामूल्य तर बिगर आदिवासींना सशुल्क मार्गदर्शन केले जाईल.





