नवी मुंबईमधील एमआयडीसी महापे ते कळंबोली सर्कल रोड ते एलेक्स–कार्ड नाका रोड आणि एमएमआरडीए फलक उभारणीचे काम चालू आहे. तसेच ठाणे-बेलापूर रोडवर भारत बिजली, सिमेन्स कंपनीजवळ पुलावर गर्डर टाकण्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्ग २९ मे ते ४ जूनपर्यंत रात्रीच्या वेळी बंद ठेवला जाणार आहे.
२९ मे रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते ४ जून रोजी पहाटे ५ वाजण्या दरम्यान पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित रस्ता तात्पुरत्या स्वरूपात पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. त्यानुसार वाहतूककोंडी टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना देण्यात आली आहे, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.
वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे–बेलापूर रोडवरील सहाचाकी व त्यावरील सर्व वाहने मुकुंद कंपनीजवळून एमआयडीसीमार्गे वळविण्यात येतील. तसेच अवजड वाहने भारत विजेळी कंपनीजवळून पाम बीच रोडकडे वळवण्यात येणार आहेत. दरम्यान, बेलापूरहून ठाण्याकडे जाणारी वाहने रबाळे नाका सिग्नल येथून उजव्या बाजूने एमआयडीसी मार्गाकडे वळविण्यात येतील. घणसोलीमार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दिवा गाव–तळोजा मार्गाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा विचार करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.





