आरटीई प्रवेशाचा आज अंतिम दिवस

महाराष्ट्र टाइम्स

आरटीई प्रवेशाचा आज अंतिम दिवस आहे. नागपूर जिल्ह्यातून २५ हजार ३८८ अर्ज आले होते, त्यापैकी ८ हजार ९७३ विद्यार्थ्यांची लॉटरी लागली. ५ हजार ७९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित जागांसाठी पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर खात्री करावी. मूळ कागदपत्रे आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट आवश्यक आहे.

last date for rte admission important documents to bring today

उपलब्ध आकडेवारीनुसार, आरटीई अंतर्गत एकूण पात्र शाळा ६४२ शाळांसाठी नागपूर जिल्ह्यातून २५ हजार ३८८ बालकांचे अर्ज दाखल झाले. यापैकी ८ हजार ९७३ विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड करण्यात आली. तसेच आतापर्यंत ५ हजार ७९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश अंतिम झाले आहेत. अद्याप उर्वरित जागा रिक्त असून पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्याची ही चांगली संधी मानली जात आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रतीक्षा यादीतील पहिल्या टप्प्यातील पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आज, शुक्रवारी अंतिम दिवस आहे.

यापूर्वी प्रतीक्षा यादीतील पहिल्या टप्प्यातील बालकांना प्रवेशासाठी १५ ते २३ मेपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, अनेक पालकांची गैरसोय टाळण्यासाठी २९ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार, पालकांनी आज, शुक्रवारी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाद्वारे करण्यात आले आहे.

प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएस पाठवले जात आहेत. परंतु, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली की नाही याची खात्री करावी. पालकांनी ॲडमिट कार्ड काढण्यासाठी स्वतः लॉगिन करू नये. पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा. पालकांनी अर्ज भरताना नोंदविलेल्या सर्व मूळ कागदपत्रांच्या प्रति आणि साक्षांकित प्रति सोबत ठेवाव्यात. तसेच आपल्या लॉगिनमधून किंवा पडताळणी समितीकडून अलॉटमेंट लेटर आणि पोर्टलवरील हमीपत्राची प्रिंट काढून घ्यावी.

पडताळणी समितीकडून ऑनलाइन प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेणे अनिवार्य आहे. नागपूरमधील उन्हाची वाढती तीव्रता आणि तापमानाचा अंदाज घेता कागदपत्रांच्या पडताळणीसाठी केंद्रावर येताना पालकांनी लहान मुलांना सोबत आणू नये, पालकांनी आरोग्याची काळजी घेऊन विहित मुदतीत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे.