ऐरोली येथील ज्येष्ठ नागरिकांना पोस्ट कार्यालयातील विविध कामांसाठी दीर्घकाळ रांगेत उभे राहावे लागत होते. त्यामुळे त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अखेरीस ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये स्वतंत्र सेवा खिडकी सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेबाबत आनंद व्यक्त केला आहे.
विविध योजना, सेवा-सुविधांसाठी तसेच पोस्टातील बचत खात्यात पैसे ठेवण्यासाठी-काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक तेथे जात असतात. यासाठी त्यांना मोठ्या रांगेत उभे रहावे लागत होते. पोस्ट कार्यालयात बराच वेळ जात असल्याने ज्येष्ठांना शारीरिक त्रास, थकवा तसेच वेळेची मोठी गैरसोय सहन करावी लागत होती. त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग असावी अशी मागणी केली जात होती. ज्येष्ठांच्या या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक मामित चौगुले यांनी पाठपुरावा केला. अखेर ऐरोली पोस्ट कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सेवा खिडकी सुरू करण्यात आली आहे.
हा निर्णय केवळ प्रशासकीय सुविधा नसून आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या सोयीचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, असे चौगुले यांनी सांगितले.





