२०२८च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी महाराष्ट्र उत्सुक

महाराष्ट्र टाइम्स

२०२८च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावाला केंद्रातून मंजुरी मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. २०३०च्या राष्ट्रकुल आणि २०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही भारत सज्ज होत आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

२०२८च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी महाराष्ट्र उत्सुक
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. कितीही ज्ञान किंवा सत्ता असली, तरी शरीर साथ देत नसेल तर ते निरुपयोगी आहे’, असे सांगत नितीन गडकरी यांनी तरुणाईला मोबाइलपासून दूर राहून मैदानावर खेळण्याचे आवाहन केले. या महोत्सवामुळे नागपूरकरांमध्ये सुखांक वाढण्यास मदत होईल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी २०२८च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित करण्याबाबत संकेत दिले. स्पर्धेच्या आयोजनासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

नागपुरात ३१ मे ते ७ जून आयोजित होणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा बुधवारी नागपुरात सन्मान करण्यात आला. त्यावेळी बोलताना मोहोळ यांनी माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या आगामी काळातील ध्येयांवर प्रकाश टाकताना मोहोळ यांनी सांगितले की, २०३०च्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताची तयारी सुरू आहे. या जागतिक स्पर्धेत देशाला अधिकाधिक पदके मिळवून देण्यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा आणि ताकद पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा असून, ऑलिम्पियन आणि राष्ट्रकुल पदविजेते देणारा हा महाराष्ट्र आहे. नवीन जबाबदारी स्वीकारलेले सर्व पदाधिकारी हे स्वतः क्रीडा क्षेत्राशी निगडित आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना ताकद देऊन त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम बनवण्यासाठी आम्ही पूर्ण वेळ आणि निष्ठेने काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऐंशी हजार खेळाडूंचा सहभाग असलेल्या या महोत्सवातून भविष्यातील शंभर ते दोनशे असे खेळाडू घडतील, जे देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूरच्या या यशस्वी क्रीडा महोत्सवाचा आदर्श घेऊनच आम्ही पुण्यातही अशाच प्रकारचा ‘खासदार क्रीडा महोत्सव’ यशस्वीपणे राबवू शकलो. चांगल्या गोष्टींचे अनुकरण करून त्यातून शिकणे हेच क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्राला नवीन उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक, माजी आमदार संदीप जोशी यांनी केले. यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाच्या चषकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार संदीप जोशी, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव संजय शेटे, मनोज भोरे, स्मिता यादव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.