चीनमधील रोबो पोलिस

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

चीनमध्ये रोबो पोलिस आता रस्त्यावर गस्त घालत आहेत. ते वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांना माहिती देण्याचे काम करत आहेत. भारतातही केरळ आणि रेल्वे स्थानकांवर रोबोचा वापर सुरू झाला आहे. विशाखापट्टणम स्थानकावर एएससी अर्जुन नावाचा रोबो प्रवाशांना मदत करत आहे. रोबो पोलिसांमुळे मानवी पोलिसांवरील ताण कमी होत आहे.

चीनमधील रोबो पोलिस

नमधील काही शहरांत सार्वजनिक ठिकाणी रोबो पोलिस प्रत्यक्ष काम करताना दिसू लागले आहेत. त्यातले काही माणसासारखे दिसणारे ह्युमनॉइड आहेत, तर काही इतर स्वरूपाचे. ह्युमनॉइड रोबोशी संवाद साधणे लोकांना अधिक सोपे वाटते, असे निरीक्षण आहे.

वाहतूक व्यवस्थापनात रोबो खरोखरीच उपयुक्त आहेत. वुहू आणि हांगझोऊसारख्या शहरांमध्ये एआय वापरणारे वाहतूक रोबो पादचारी, सायकलस्वार, आणि वाहनचालक यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. नियमभंग झाल्यास इशारा देतात आणि संबंधित माहिती नियंत्रण कक्षाकडे पाठवतात. शेन्झेन आणि गुआंग्डाँग प्रांतात रोबो पोलिस मानवी पोलिसांबरोबर गस्त घालतात. कॅमेरे, सेन्सर्स, आणि एआय प्रणालींच्या मदतीने हे रोबो काटेकोर निरीक्षण करतात. काही संशयास्पद आढळल्यास ते त्वरित ॲलर्ट पाठवतात. त्यानंतर मानवी पोलिस प्रत्यक्ष हस्तक्षेप करतात.

पोलिस अनेक वेळा नागरिकांना माहिती देतात, मार्गदर्शन करतात. विशेषत: पर्यटकांना अशी मदत आवश्यक असते. चीनमधील काही रेल्वे स्थानके आणि पर्यटन स्थळांवर आता रोबो हे काम करत आहेत. हे रोबॉट्स चोवीस तास, कोणत्याही वातावरणात काम करू शकत असल्याने मानवी पोलिसांवरचा ताण कमी होतो.

भारतामध्येही असे प्रयोग झाले आहेत. केरळ पोलिसांनी २०१९ मध्ये एक ह्युमनॉइड रोबो माहिती देण्यासाठी मुख्यालयात ठेवला होता. भारतीय रेल्वेने काही स्थानकांवर माहिती देणाऱ्या ह्युमनॉइड रोबोचे प्रयोग केले आहेत. जानेवारी २०२६ पासून विशाखापट्टणम स्थानकावर एएससी अर्जुन हा अत्याधुनिक ह्युमनॉइड रोबो प्रवाशांना विविध भाषांतून माहिती देतो. शिवाय एआय आणि फेस रेकग्निशन वापरून सुरक्षा व्यवस्था आणि गर्दीचे नियंत्रण करण्यातही तो महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

रोबो पोलिसांसोबत काम करतात, तेव्हा नागरिक त्यांच्याशी कसा संवाद साधतात, त्यांचा फायदा कुठे होतो, त्यांच्या मर्यादा काय असतात, हे समोर येते. यातून पुढील वाटचालीला दिशा मिळू शकते.

- डॉ. मेघश्री दळवी