यले चेंगड करून रायले बे!’ असं कुणी म्हटलं की ऐकणारे कान टवकारतात. ‘आपलं जरा जास्तच सुरू आहे,’ असंही वाटून जातं. मग थांबायचं की चेंगड करण्याची तीव्रता वाढवायची हे त्या वेळच्या ‘मूड’वर अवलंबून असतं. काही शब्दांना असा खास ‘मूड’ असतो की वेळ-प्रसंगावर त्या शब्दाचा अर्थ बेतलेला. ‘चेंगड’ हा शब्द असाच. खास नागपुरी. नागपूर शहर आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे वऱ्हाड आणि झाडीपट्टीचा संमिश्र प्रयोग. खास वऱ्हाडी शब्द येथे नांदतात आणि झाडीबोलीतले शब्द खेळतात. यात काही विशेष शब्द आपला ‘नागपुरी बाणा’ कायम राखून आहेत. ‘चेंगड’ हे असेच खास उदाहरण. चेंगडचा समानार्थी शब्द म्हणाल तर गोंधळ. प्रसंगी गोंगाट-गर्दीही. चेंगड असणं म्हणजे काही तरी वेगळं घडलेलं असणं. चेंगड शब्द आला की उत्सुकता आली. उत्सुकता म्हटली की पावलं वळणार तरी किंवा कान सजग होणार तरी! चेंगड कोण करतंय, हे बघण्याची उत्सुकता. हा शब्द मराठी की हिंदी, यात नागपूरकर माणूस पडत नाही. मराठीत बोलताना हा शब्द सहज येतो आणि हिंदीत बोलत असला तरीही वाक्यात हा शब्द सहज सामावून जातो. ‘भोत चेंगड होरी’ म्हटलं की झालं! जिथे ‘चेंगड’ होत आहे, तिथे काही तरी वेगळं घडत आहे, हे निश्चित. बरं ही चेंगड एखाद्या व्यक्तीची असू शकते किंवा गटाचीही. प्रमाणभाषेत सांगायचं तर ग्रुपची. लहानग्यांची असू शकते आणि मोठ्यांचीही. लहानग्यांची चेंगड कधी कधी ‘क्युट’ वाटते. आईसाठी मात्र ही डोकेदुखी. मोठ्यांची चेंगड सुरू असेल तर रागवणार कोण? चेंगड म्हणजे साधा गोंधळ नाही. गोंधळाचा एकदम वरचा टप्पा. अध्ये-मध्ये काही नाही. वर्गात एखादा मुलगा चेंगड करतो, एखाद्या ठिकाणी एखादा ग्रुप चेंगडच्या मूडमध्ये असतो. चेंगड करणं हा आपला धर्म आहे आणि चेंगड करून राहणारच, असं वाटणारेही ग्रुप्स असतात कट्ट्यांवर, कॉलेजांतल्या कानाकोपऱ्यांत. यात ना मुलगे मागे, ना मुली. मग ग्रुपचाच एखादा/एखादी समूजतदार मुलगा/मुलगी म्हणतो/म्हणते, ‘यार, चेंगड नोका करू!’ पण त्याचं किंवा तिचं ऐकतं कोण!