हत्तीच्या पिल्लावर ‘वनतारा’त उपचार

Contributed by: गुवाहाटी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

विशेष क्रेट, गादी, वैद्यकीय पथक

हत्तीच्या पिल्लावर ‘वनतारा’त उपचार
जन्मापासूनच संघर्ष करणाऱ्या ‘राजा’ या सात आठवड्यांच्या आशियायी हत्तीच्या पिल्लाला शुक्रवारी उपचारांसाठी आसाममधील पोहुमारा येथून जामनगर येथील ‘वनतारा’च्या वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्रात विमानाने हलवण्यात आले. गेल्या सात आठवड्यांपासून ‘वनतारा’चे पशुवैद्यकीय पथक त्याच्या मालकाच्या घरी उपचार करत होते. मात्र, प्रकृतीतील गुंतागुंत वाढल्याने सुसज्ज रुग्णालयात उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनंत अंबानी यांच्या मदतीने भारतात अशा प्रकारचे हे तिसरे एअरलिफ्ट करण्यात आले.

राजाचा जन्म दोन ऑक्टोबरला आसाममधील गोगामुख येथे झाला. त्याची आई अवघी ११ वर्षांची आणि अनुभवहीन होती. प्रसूतीनंतर अस्वस्थ अवस्थेत तिने पिल्लाला लाथ मारल्याने त्याच्या मागच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड पहिल्याच दिवशी फ्रॅक्चर झाले. आईचे दूधही न मिळाल्याने मालकाने ‘वनतारा’कडे मदत मागितली. आठ ऑक्टोबरला पोहोचलेल्या ‘वनतारा’च्या पथकाने प्लास्टर आणि बँडेजने पाय स्थिर केला व विशेष दूध देण्यास सुरुवात केली.
हालचालींवरील मर्यादांमुळे राजाची प्रकृती अधिक गुंतागुंतीची झाली. जुलाब, क्लेब्सिएला न्यूमोनियाचा संसर्ग, रक्तातील साखर कमी होणे, यकृतावरील ताण, डोक्यावरील दाबामुळे जखमा, नाभीचा हर्निया आणि अशक्तपणा अशा समस्यांना त्याला सामोरे जावे लागले. प्रतिजैविके, शिरेतून द्रवपदार्थ, यकृताला आधार देणारी औषधे, जीवनसत्त्वे, खनिजे, प्रोबायोटिक्स, जखमांची निगा आणि विशेष आहार असे उपचार करूनही त्याची प्रकृती गंभीर आहे. ‘वनतारा’त दाखल झाल्यानंतर त्याची सविस्तर तपासणी करून वेदनानियंत्रण, औषधोपचार, हालचालींसाठी थेरपी आणि पोषण पुनर्वसन केले जाईल. त्याला आयुष्यभर वैद्यकीय देखरेखीची गरज भासू शकते. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी स्थापन केलेले ‘वनतारा’ प्रगत वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञांच्या मदतीने प्राण्यांचे बचाव, उपचार व पुनर्वसन करते. ‘राजाने सात आठवड्यांपासून मोठ्या धैर्याने लढा दिला आहे. आता त्याला उभे राहण्याची, चालण्याची आणि एक दिवस धावण्याची संधी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,’ असे वनताराचे सीईओ विवान करानी यांनी सांगितले.

आसाम ते जामनगर हे अडीच हजार किलोमीटरचे अंतर रस्त्याने पार करणे पिल्लासाठी धोकादायक असल्याने विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे चार तासांच्या या प्रवासासाठी त्याच्या आकारानुसार विशेष क्रेट तयार केले आहे. फ्रॅक्चर झालेला पाय स्थिर राहावा आणि विमानाच्या हालचालींचे धक्के बसू नयेत, यासाठी त्यात मऊ गादीची व्यवस्था आहे. पशुवैद्यक, काळजीवाहूंचे पथकही त्याच्यासोबत असेल.