सोनियांच्या घरात होणार संग्रहालय

Contributed by: नवी दिल्ली,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सोनियांच्या घरात होणार संग्रहालय
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या इटलीतील बालपणीच्या घराचे संग्रहालयात रूपांतर करण्याची तयारी सुरू आहे. इटलीस्थित शीख उद्योजक सुखदेवसिंग कांग यांनी हे घर सहा वर्षांपूर्वी विकत घेतले आहे. गांधी कुटुंबीयांची भेट घेऊन संग्रहालयासाठी छायाचित्रे, कागदपत्रे आणि इतर आठवणींच्या वस्तू मिळवण्याची त्यांची इच्छा आहे.

इटलीतील व्हिसेन्झा प्रांतातील लुजियाना येथे असलेल्या या घराला ‘इंडियन हाउस’ असे नाव देण्यात आले आहे. घराबाहेर तिरंगा असून, ‘सोनिया गांधी यांचे जन्मस्थान’ असा फलक लावण्यात आला आहे. सहा खोल्यांचे हे घर दगड आणि काँक्रीटच्या इमारतीत आहे. सोनिया गांधी यांचा जन्म नऊ डिसेंबर १९४६ रोजी याच घरात झाला. त्यांच्या बालपणीचा काही काळही येथे गेला.
५२वर्षीय कांग हे मूळचे होशियारपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. १९९२मध्ये ते इटलीत गेले. सुरुवातीला त्यांनी दुग्धव्यवसाय, शेती आणि कारखान्यात काम केले. २०२०मध्ये त्यांनी पत्नी आणि मुलीच्या नावावर हे घर खरेदी केले. घराची देखभाल करण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यटकांना घर पाहण्याची सुविधाही उपलब्ध आहे. मालमत्ता करासह घरावर दर वर्षी सुमारे एक हजार युरो खर्च होतो.

कांग आणि त्यांचे कुटुंब गांधी कुटुंबीयांचे चाहते आहेत. त्यांनी घर भाड्याने देण्याच्या किंवा तेथे गुरुद्वारा उभारण्याच्या ऑफर नाकारल्या. घराचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संग्रहालय उभारण्यासाठी गांधी कुटुंबीयांकडून माहिती आणि वस्तू मिळणे आवश्यक असल्याचे कांग यांनी सांगितले. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करण्याची त्यांची अपेक्षा आहे. संग्रहालयामुळे इटलीतील या गावात पर्यटन वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी त्यांना आशा आहे.