Contributed by: नवी दिल्ली,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पंतप्रधान म्हणाले...
‘विविध देशांमधील संबंध केवळ सुरक्षा, अर्थव्यवस्था किंवा संपर्क व्यवस्थेपुरते मर्यादित राहू नयेत. सांस्कृतिक संवाद आणि सांस्कृतिक सहकार्य यामुळे हे संबंध अधिक दृढ होऊ शकतात,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.
दिल्लीतील ऐतिहासिक पुराना किल्ला येथे आयोजित पहिल्या ‘एससीओ (शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन) सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरम’चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘या व्यासपीठातून नव्या कल्पना पुढे येतील, सांस्कृतिक सहकार्यासाठी नव्या संधी निर्माण होतील आणि सांस्कृतिक अनुभव जगाला एकत्र आणण्यास मदत करतील,’ असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. परराष्ट्र आणि सांस्कृतिक कार्यक्रम मंत्रालयाकडून आयोजित या फोरमला पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक यांच्यासह ‘एससीओ’ सदस्य देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.मोदी पुढे म्हणाले, ‘अलीकडच्या काळात ‘एससीओ’ने सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि संपर्क क्षेत्रातील सहकार्य मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. आता सांस्कृतिक सहकार्यामुळे सदस्य देशांमधील संबंधांना अधिक सखोलता मिळू शकते. सांस्कृतिक संवादांनी जग समृद्ध केलेसाम्राज्यांनी जगाचे नकाशे बदलले असतील; परंतु सांस्कृतिक संवादांनी जगाच्या कल्पना बदलल्या आणि त्यांना समृद्ध केले. हे जगाला दिशा देणारे व्यासपीठ ठरू शकते.’
‘एससीओ’ची ओळख आतापर्यंत सुरक्षा, अर्थकारण आणि प्रादेशिक सहकार्यासाठी होती. भारताने या फोरममधून सांस्कृतिक संवादाचा मुद्दा पुढे आणला आहे. यामुळे सदस्य देशांमध्ये राजकीय मतभेद असले, तरी लोकसंस्कृती, इतिहास आणि वारशाच्या आधारावर संवादाची नवी जागा तयार होऊ शकते.