भुवनेश्वर : ओडिशातील गोपाळपूर किनाऱ्याजवळ शुक्रवारी सकाळी धडकलेल्या ‘अकवान’ चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडत असला, तरी अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याची माहिती ओडिशाचे आपत्ती व्यवस्थापनमंत्री सुरेश पुजारी यांनी दिली.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ जमिनीवर धडकण्याची प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू होऊन ११.२० वाजता पूर्ण झाली. सकाळी साडेसात ते साडेआठ दरम्यान ताशी ७०-८० किलोमीटर, तर काही वेळा ९० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हे वादळ दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीवरील गोपाळपूरजवळून पुढे सरकले. आतापर्यंत ३,७२,००० नागरिकांचे सुरक्षित निवारा केंद्रांत स्थलांतर करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गंजममध्ये सरासरी ११४.६ मिमी, केंद्रपाडामध्ये ६४.६ मिमी पाऊस झाला.