Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना शुक्रवारी रात्री दुहेरी मनस्तापाला सामोरे जावे लागले. विक्रोळी स्थानकात मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने मेल-एक्स्प्रेससह लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला, तर दुसरीकडे सीएसएमटी स्थानकातील सातही उपनगरी फलाटांवरील इंडिकेटर बंद पडल्याने प्रवाशांची माहितीअभावी धावपळ उडाली. दोन्ही बिघाडांमुळे रात्री उशिरापर्यंत प्रवाशांचे हाल सुरू होते.
मांडवी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री १०.०५ पासून विक्रोळी स्थानकातील सहाव्या मार्गिकेवर खोळंबली. या गाडीमागे लोकल रखडल्याने उपनगरी वाहतुकीवरही परिणाम झाला. अखेर काही प्रवाशांनी रुळांवरून चालत जवळचे स्थानक गाठण्याचा मार्ग स्वीकारला. रात्री उशिरापर्यंत लोकल व एक्स्प्रेसच्या वाहतुकीचा खोळंबा कायम होता.दरम्यान, सीएसएमटी स्थानकातील १ ते ७ या फलाटांवरील इंडिकेटर गुरुवारी रात्री ९.४२ पासून बंद पडले. वीजपुरवठ्यातील बिघाडामुळे ही यंत्रणा ठप्प झाल्याचे ‘मरे’कडून स्पष्ट करण्यात आले. सीएसएमटीसारख्या महत्त्वाच्या स्थानकावरील सर्व इंडिकेटर बंद पडल्याने प्रवाशांना गाड्यांचे फलाट, वेळ व गंतव्यस्थान यांची माहिती मिळवताना अडचणींचा सामना करावा लागला.