मोदींचा अंबाजी दौरा पुढे ढकलला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
modis ambaji tour postponed decision for devotees
गांधीनगर : गुजरातमधील अंबाजी मंदिरात लाभपंचमीला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ नोव्हेंबरचा नियोजित दौरा पुढे ढकलला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांनी स्वतः हा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी दिली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. मोदी आगामी काळात पुन्हा अंबाजीचे दर्शन घेणार आहेत.

सिक्कीममध्ये
९०० पर्यटकांची सुटका

गंगटोक : पूर्व सिक्कीममधील नाथुला, बाबा मंदिर आणि त्सोमगो तलाव परिसरात जोरदार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या ९०० हून अधिक पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची भारतीय लष्कराने सुखरूप सुटका केली. गुरुवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळे उंचावरील भागातील वाहतूक विस्कळित झाली होती. प्रतिकूल हवामानात लष्कराच्या त्रिशक्ती कोअरच्या जवानांनी बचावमोहीम राबवून सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलविले. नाथुला ही चीनच्या सीमेलगतची खिंड असून, त्सोमगो हा हिमनदीपासून तयार झालेला तलाव आहे.

लक्ष्मीकांत पर्रीकर

भाजपमध्ये परतले

पणजी : सन २०२२मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देणारे गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पर्रीकर यांनी शुक्रवारी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. मार्चपूर्वी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्रीकर यांचा पक्षप्रवेश झाला आहे. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पक्षाचे अन्य नेते उपस्थित होते. पर्रीकर नोव्हेंबर २०१४ ते मार्च २०१७ या कालावधीत गोव्याचे मुख्यमंत्री होते. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून काँग्रेसचे दयानंद सोपटे यांनी पर्रीकर यांचा पराभव केला होता. सोपटे २०१९ मध्ये भाजपमध्ये दाखल झाले. जानेवारी २०२२मध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी मांद्रे मतदारसंघातून पुन्हा सोपटे यांनाच उमेदवारी दिल्यानंतर पर्रीकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.

सौरभ चंद्राकरला ‘ईडी’कडून अटक

रायपूर : कोट्यवधी रुपयांच्या महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप फसवणूकप्रकरणातील मुख्य आरोपी आणि ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली. चंद्राकर याला विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयाचे न्यायाधीश अमित राठोड यांनी १९ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याआधी ‘सीबीआय’ने अटक केल्यानंतर रायपूरमधील विशेष सीबीआय न्यायालयाने चंद्राकरला १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.