Decrease In Wheat Sowing Area Impact On Production
रब्बी पिकांच्या क्षेत्रात यंदा घट
Contributed by: नवी दिल्ली,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
प्रमुख रब्बी पीक असलेल्या गव्हाची यंदा आतापर्यंत ५०.०७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ५९.१० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा गव्हाच्या पेरणीखालील क्षेत्रात १५.२७ टक्क्यांची घट झाली आहे. सर्व रब्बी पिकांच्या पेरणीखालील एकूण क्षेत्रातही ११.३३ टक्क्यांची घट झाली आहे.
यंदा १३ नोव्हेंबरपर्यंत १७८.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हे क्षेत्र २०१.०४ लाख हेक्टर होते, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केली.गव्हाची पेरणी साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केली जाते, तर मार्च-एप्रिलमध्ये काढणी होते. २०२५-२६ या पीक वर्षात (जुलै-जून) देशात ३३६ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड झाली होती. ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाच्या पेरणीचा वेग मंदावला आहे.
जून ते सप्टेंबरदरम्यानच्या मान्सूनमध्ये १३ टक्क्यांची तूट राहिल्याने पेरणीपूर्वी जमिनीतील उरलेला ओलावा कमी झाला. त्यामुळे पेरणीवर परिणाम झाला आहे.
पाणीपुरवठ्याची उपलब्धता कमी असणे हेही यामागील आणखी एक कारण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. गहू उत्पादक प्रमुख राज्यांमध्ये जलाशय आणि कालव्यांमधील पाण्याची पातळी सामान्यपेक्षा कमी आहे. गव्हाला पेरणीनंतर अनेक वेळा सिंचनाची गरज असते.