नव्वद मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या तांत्रिक बिघाडामुळे ‘ युनायटेड एअरलाइन्स ’ला सोमवारी आपली उड्डाणे विलंबाने सोडावी लागली. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या ‘फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन’च्या नेटवर्कमध्ये बिघाड झाल्यामुळे देशभरातील विमानसेवा ठप्प झाली होती, त्यानंतर ही घटना घडली आहे.
हवेत असलेली विमाने आणि ‘युनायटेड एक्स्प्रेस’ या प्रादेशिक नेटवर्कच्या उड्डाणांवर याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे ‘युनायटेड एअरलाइन्स’ने स्पष्ट केले; तसेच हा सायबर सुरक्षेशी संबंधित हल्ला असल्याचे कोणतेही संकेत नसल्याचे कंपनीने म्हटले. सुमारे एक तास ४० मिनिटांनी ही समस्या सोडवण्यात आली.